चिंचवड विधानसभा : मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ फेब्रुवारी । चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी एकूण 510 मतदान केंद्रांवर येत्या रविवारी (दि. 26) मतदान होणार आहे. तर, 2 मार्चला थेरगावातील शंकरराव गावडे कामगार भवनात मतमोजणी केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक ईव्हीएम व यंत्रसामग्री तयार करण्यात आली असून, अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक चांगल्या प्रकारे पार पाडावी, म्हणून निवडणूक विभाग खबरदारी घेत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सोमवारी सांगितले.

दिव्यांग मतदार 12 हजार 313 मतदार
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 68 हजार 954 मतदार आहेत. त्यात 3 लाख 2 हजार 946 पुरुष, 2 लाख 65 हजार 974 महिला आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत. त्यात एकूण 12 हजार 313 दिव्यांग मतदार आहेत. तर, 80 वर्षांवरील वयोवृद्ध मतदारांची संख्या 9 हजार 926 आहे. तसेच, 331 अनिवासी भारतीय आणि 168 सैनिक मतदार आहेत.

510 पैकी 13 मतदान केंद्रे संवेदनशील
मतदारसंघात एकूण 510 मतदान केंद्र आहे. त्यापैकी 13 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. कमी किंवा अधिक मतदान होणे. केंद्रांच्या मतदार यादीत एका कुटुंबाची सलग नावे नसणे, बोगस मतदानांच्या तक्रारी अधिक असणे अशी मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यात मामुर्डी येथील सेंट जॉर्ज स्कूल, किवळे येथील विद्याभवन स्कूल, भोईरनगर येथील जयवंत शाळा, पुनावळे येथील मनीषा भोईर विरंगुळा केंद्र, चिंचवडगाव येथील महात्मा फुले प्राथमिक शाळा, थेरगाव येथील फकिरभाई पानसरे उर्दू विद्यालय, पिंपळे सौदागर येथील यशवंतराव चव्हाण विद्यालय, पी. के. स्कूल, जी. के. गुरुकुल, पिंपळे गुरव येथील पालिका शाळा, विशालनगर येथील विद्याविनय निकेतन शाळा या ठिकाणच्या मतदान केंद्रांचा समावेश आहे. एकूण 51 केंद्रांचे वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे.

मतदानासाठी 2 हजार 550 कर्मचारी
चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.26) मतदान होणार आहे. संघातील 510 केंद्रांवर सुरळीतपणे मतदान होण्यासाठी तब्बल 2 हजार 550 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांना मतदान प्रक्रियेसंदर्भातील दोन प्रशिक्षण देण्यात आले आहे. तिसरे व अखेरचे प्रशिक्षण शनिवारी (दि.25) दिले जाणार आहे. संघात 47 झोनल अधिकारी व संवेदनशील मतदान केंद्रांसाठी 11 सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचेही दुसरे प्रशिक्षण शनिवारी होणार आहे.

पोलिस बंदोबस्त
मतदानाच्या दिवशी सर्वच मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपीच्या प्रत्येकी 1 तुकडी आणि आरपीएफच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे एकूण 836 पोलिस व 169 होमगार्डचा बंदोबस्त पुरविला जाणार आहे. आचारसंहितेचे पालन व्हावे म्हणून विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यात एफसीटीचे 12, एसएसटीचे 7, व्हीएसटीचे 6, व्हीव्हीटीचे 1 पथक तयार करण्यात आले आहे.

मतमोजणीच्या 37 फेर्‍या
मत मोजणी 2 मार्चला थेरगाव रुग्णालयाशेजारच्या शंकरराव गावडे कामगार भवन येथे होणार आहे. एकूण 37 फेर्‍यांमध्ये संपूर्ण मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी 16 टेबल असणार आहेत. मोजणीसाठी 2 हजार 40 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. राखीव 510 कर्मचारी असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *