महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी – अजय विघे – कोपरगाव तालुक्यातील नगर- मनमाड राज्य मार्गावर साईधाम पाटी जवळ दुचाकीला झालेल्या अपघातात येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील तरुण शिवहरी विलास भोरकडे (वय- १८) हा तरुण जखमी झाला असता त्यास शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता त्या ठिकाणी त्याचे उपचारा दरम्यान निधन झाले असून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
वाहनांच्या प्रचंड गर्दीने येवला कोपरगाव रोडवर अपघाताची मालिका अखंडितपणे सुरु आहे. अशीच घटना कोपरगाव – येवला रोडवर साईधाम कमानी जवळ हा मयत तरुण आपल्या कामासाठी २३ फेब्रुवारी रोजी येवल्याकडून कोपरगाव कडे येत असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्यास उपचारार्थ शिर्डी येथील साईबाबा | संस्थांनच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरु असताना त्याचे त्यात २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. या प्रकरणी तेथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद चौधरी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलिस नाईक दारकुंडे यानी भेट दिली आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खबर देणार डॉ. चौधरी यांच्या तक्रारीनुसार अकस्मात मृत्यू नोंदणी क्रं. ११/२०२३ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. एम. दारकुंडे हे करीत आहेत.