महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आज दारू घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam) चौकशीसाठी सीबीआय (CBI) कार्यालयात दाखल होत आहेत.
यादरम्यान सिसोदिया यांचं मनोबल वाढवण्यासाठी हजारो कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर पोहोचले आहेत. दरम्यान, सिसोदिया यांच्या घराबाहेर प्रशासनानं मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी सिसोदिया यांनी ट्विट केलं की, “आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. तपासात मी पूर्ण सहकार्य करेन. लाखो मुलांचं प्रेम आणि करोडो देशवासीयांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मला काही महिने तुरुंगात राहावं लागलं तरी चालेल. पण, तुम्ही काळजी करू नका. मी भगतसिंग यांचा अनुयायी आहे. अशा खोट्या आरोपांमुळं तुरुंगात जाणं ही छोटी गोष्ट आहे. ”
सिसोदिया यांच्या ट्विटनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी रिट्विट करत लिहिलं, ”मनीष तुझ्यासोबत देव आहे. लाखो मुलं आणि त्यांच्या पालकांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत. देशासाठी आणि समाजासाठी तुरुंगात जाणं हा शाप नसून गौरव आहे. तू लवकरच तुरुंगातून परत येवो, अशी मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो. मुलं, पालक आणि आम्ही सर्व दिल्लीवासीय तुमची वाट पाहत आहोत.” दरम्यान, सीबीआय आज मनीष सिसोदिया यांना अटक करू शकते, अशी भीती आम आदमी पक्षाला आहे.