मी टीजर, ट्रेलर दाखवणार नाही, २२ तारखेला थेट सिनेमाच दाखवेन!” ; राज ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ फेब्रुवारी । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा वाद सध्या थेट सर्वोच्च न्यायालयात भरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा न्यायालयासमोर आहे. त्यावर सुनावणी चालू आहे. त्याचवेळी निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नाव शिंदे गटाला दिल्यामुळे ठाकरे गटासाठी तो मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यामुळे राजकीय वादाचा आखाडा थेट विधानभवनात उभा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या घडामोडींवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त पनवेलमध्ये राज ठाकरेंच्या जाहीर मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी “महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल झालाय” अशी प्रतिक्रिया देत खंत व्यक्त केली आहे. तसेच, “म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय”, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, या मुलाखतीमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींविषयी प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी पूर्वी या सर्व गोष्टी समोरासमोर व्हायच्या असं म्हटलं. “महाराष्ट्रातल्या राजकारणाचा चिखल झालाय. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. ज्या काही गोष्टी असतील, विरोध वगैरे या सगळ्या गोष्टी आमने-सामने असायच्या. मी विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी गेलो होतो. खाली सगळे बसले होते. मला कळतच नव्हतं की कोण कुठल्या पक्षात आहे”, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी केली.

“सध्या कुणी आला की साहेब मी आमदार आहे, तर त्याला कुठला? असं विचारावं लागतं. सध्या तो अमका कुठे असतो? विचारलं तर ‘नाही तो तिकडे गेला ना आता’ असं उत्तर येईल”, असंही ते म्हणाले.

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंना अजित पवारांच्या एका विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट या वादाबाबत ‘एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील तर काय निर्णय देणार? मनसेचे उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. या एका आमदाराने उद्या मनसे पक्ष माझा, इंजिन हे निवडणूक चिन्हही माझेच, असा दावा केला तर तुम्ही शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय घेतला होता, तोच निर्णय देणार का?’ असा प्रश्न अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. तसं खरंच होईल का, यासंदर्भात राज ठाकरेंनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर त्यांच्या मिश्किल शैलीत उत्तर दिलं.

“मला आमच्या राजू पाटलांना विचारायचंही आहे, घेता का म्हणून. एकदा आमचं हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतंय ते कळेल तुम्हाला. दिवस-रात्र आम्ही बरनॉल लावत असतो”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“२२ तारखेला थेट सिनेमाच दाखवेन”
“म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. महाराष्ट्रात जे काही चालू आहे, जे झालंय या विषयावर मी सविस्तर २२ तारखेला शिवतीर्थावर गुढी पाडव्याला बोलणार आहे. मी कोणतेही ट्रेलर, टीझर दाखवणार नाही. मी थेट २२ तारखेला सिनेमाच दाखवेन”, असं राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *