महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।३ मार्च । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील इंदूर येथे खेळवला गेलेला तिसरा कसोटी सामना देखील पहिल्या दोन कसोटीप्रमाणे अवघ्या अडीच दिवसात संपला. मात्र यावेळी विजय भारताचा नाही तर ऑस्ट्रेलियाचा झाला. ऑस्ट्रेलियाने सामना 9 विकेट्स राखून जिंकत बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील आपल्या विजयाचे खाते उघडले. याचा अर्थ आता मालिकेचा निर्णय हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चौथ्या कसोटीत लागणार आहे.
भारताने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयसाठी ठेवलेल्या 76 धावांचे आव्हान कांगारूंनी 33.2 षटकात एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने दुसऱ्या डावात नाबाद 49 धावांची खेळी करत मोलाचे योगदान दिले. मार्नस लाबुशानेने नाबाद 28 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 11 बळी टिपले.
भारताने तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या दोन कसोटींप्रमाणे इंदूरची खेळपट्टी देखील पहिल्या दिवसापासून फिरकीला साथ देणारी करण्यात आली होती. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला फलंदाजी करायची होती. त्यामुळे सर्व भारताच्या मनासारखे झाले अशी क्रिकेट चाहत्यांची भावना होती.
मात्र पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच भारताचे फासे उलटे पडले. कांगारूंच्या फिरकीच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. लंचपर्यंतचा खेळ पाहता भारत शंभरी गाठू शकणार नाही असे वाटत होते. मात्र तळातील फलंदाजांनी लाज वाचवली. भारताचा पहिला डाव दोन सत्राच्या आतच 109 धावात संपुष्टात आला.
इंदूरच्या खेळपट्टीवर भारताची अवस्था अशी झाली आहे म्हटल्यावर कांगारूही फार काळ तग धरणार नाहीत असे वाटत होते. मात्र कांगारूंनी झुंजारवृत्ती दाखवली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 60 धावांची झुंजार खेळी केली. मार्नस लाबुशेन 31, स्टीव्ह स्मिथ 26 आणि ग्रीनने 21 धावा जोडत संघाला 197 धावांपर्यंत पोहचवले.
भारताने दुसऱ्या दिवशी 11 धावात कांगारूंचे 6 फलंदाज बाद करत पहिल्या डावातील आघाडी आवाक्याबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली. तरी कांगारूंनी 88 धावांची आघाडी घेत सामन्यावर आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.