हिंडेनबर्गचा वार फुस्स, गौतम अदानी दर सेकंदाला कोटींची कमाई करू लागले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०६ मार्च । गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजारात जबरदस्त कमबॅक केलं आहे. अदानी ग्रुपच्या सर्व १- कंपन्यांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी दिसून येत असून काही दिवसांपूर्वी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठ्या घसरणीचा सामना करणाऱ्या शेअर्समध्ये आता सातत्याने वाढ होताना दिसत आहे. २४ जानेवारी रोजी आलेल्या हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी शेअर्स तोंडघशी आपटले होते. तर काहींमध्ये ८०% हुन अधिकची घसरण नोंदवण्यात आली. पण आता अदानी ग्रुपच्या सकारात्मक हालचालींनी गौतम अदानींना पुन्हा एकदा फायदा होत असून शेअर्समध्ये तेजी दिसत आहे.

आज ११ टक्क्यांहून अधिक उसळी

आज सोमवारी अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून आज सकाळपासून स्टॉक मध्ये तेजीने कामकाज पाहायला मिळत आहे. अदानी समूहातील प्रमुख कंपनीचा स्टॉक सोमवार सकाळी १,९६६.७० रुपयांवर खुला झाला. त्यानंतर तो २,१३५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला तर, सकाळी ११.३० वाजता शेअर २,०९१ रुपयांवर व्यवहार करत होता. अशा प्रकारे शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसत असून गुंतवणूकदारांनी बंपर नफा कमावला आहे. दरम्यान, अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळत असून शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांची धडपड होताना दिसतेय.

दुसरीकडे, आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे सोमवारी अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी विल्मार आणि एनडीटीव्हीचे समभाग ५-५ टक्के अप्पर सर्किट लागले आहे.

अदानींची कोटींची कमाई
गेल्या आठवड्यातील शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, शुक्रवारी गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली. शुक्रवारी अदानींच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आणि समभागांच्या वाढीमुळे शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी गौतम अदानी जगातील सर्वात मोठा नफा कमाई करणारे बनले. एका दिवसात त्याची संपत्ती १४ टक्क्यांनी वाढली. शुक्रवारी त्यांनी दर सेकंदाला सुमारे २ कोटी रुपये खिशात घातले.

मागील आठवडा गौतम अदानींसाठी फायदेशीर ठरला, त्यामुळे यंदाच्या आठवड्यातही त्यांच्या शेअर्सच्या वाटचालीवर सर्वांची नजर असेल. परदेशातील रोड शोमध्ये समूहाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशी समितीबाबत अदानी समूहाकडून सकारात्मक संकेत मिळत असल्यामुळे गुंतवणूकदरांचा विश्वास पुन्हा एकदा परताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अदानीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी राहिली असून या आठवड्यातही तेच अपेक्षित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *