महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मार्च । लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये शिवसेना 21, राष्ट्रवादी काँग्रेस 19 आणि काँग्रेस 8 जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. 5 ते 6 जागांबाबत एकमत न झाल्याने त्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. लोकसभा अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
काल (दि.15 मुंबईत यशंवतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
या जागांमध्ये बदल होऊ शकतो
या बैठकीत ठरल्यानुसार मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवेल तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील 48 पैकी पाच ते सहा जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष लढणार याबाबत त्यांचे एकमत झालेले नाही. या जागांमध्ये बदल होऊ शकतो.
अंतिम शिक्कामोर्तब नाही
मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यामध्ये दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा मतदार संघात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. ईशान्य मुंबई ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि उत्तर मुंबईची जागा काँग्रेस लढणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणखी एक बैठक होणार असून त्यात अंतिम जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे.
2019 मध्ये अशी होती परिस्थिती
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. त्यावेळी 48 पैकी 23 जागा भाजपने जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला तर काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला होता.