Gudi Padwa 2023: १ तास १० मिनिटे असणार गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ मार्च । गुढी पाडव्याला आपल्याकडे नववर्षाची सुरुवात होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढी पाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या या शुभ दिनी नव्या संकल्पांचा शुभारंभ केला जातो. या महिन्यामध्ये पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. या नक्षत्रावरुन चैत्र हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसाला खगोलीय गणितानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वाची रचना केली असे म्हटले जाते. काहींच्या मते, गुढी पाडव्याच्या दिवशी सतयुगाची सुरुवात झाली होती. यंदा गुढी पाडवा २२ एप्रिल २०२३ (बुधवारी) आहे.

गुढी पाडव्याचा शुभ मुहूर्त
२१ मार्च २०२३ रोजी रात्री १०.५२ रोजी गुढी पाडव्याचा मुहूर्त सुरु होईल. तेव्हा फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर चैत्र महिन्याची सुरुवात होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ मार्च २०२३ रोजी रात्री ८ वाजून २० मिनिटांपर्यंत ही तिथी राहील. हा उत्सव २२ मार्चला साजरा करण्यात येईल. या दिवशी सकाळी ६.२९ ते ७.३९ हा गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त आहे. उदयतिथीनुसार चैत्र नवरात्रीची सुरुवातही याच दिवशी होईल.

महाराष्ट्रामध्ये गुढी पाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या तिथीनिमित्त लोक पहाटे लवकर उठून तयार होतात. घरोघरी गुढ्या उभारुन त्यांची पूजा केली जाते. घराबाहेर उभारलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करु शकत नाही असे म्हटले जाते. गुढी पाडव्याची तिथी शुभ असल्याने या दिवशी नव्या कामाची सुरुवात केली जाते. ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. अनेक ठिकाणी शोभा यात्रा निघतात. महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्ध जिंकल्यानंतर प्रथम हा सण साजरा केला होता. त्यामुळे हा सण साजरा करण्याची आपल्याकडे प्रथा सुरु झाली असेही काहीजण मानतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *