महात्मा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत आता सर्वांना उपचाराचा लाभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – बुलढाणा : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आता राज्यातील सर्वांनाच उपचाराचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. आरोग्य विभागाने याबाबत जारी केलेल्या आदेशानुसार करोनाबाधित रुग्ण तसेच करोनाची लागण नसलेल्या राज्यातील 12 कोटी लोकांना या निर्णयामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत असलेल्या सर्व रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.

शासकीय व पालिका रुग्णालयांचे सध्या करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत असल्यामुळे शासकीय व पालिका रुग्णालयांमध्ये गुडघेबदल शस्त्रक्रिया व अन्य 120 उपचारांसाठीच्या विशेष व्यवस्थेचा लाभ यापुढे जन आरोग्य योजनेतील खासगी रुग्णालयातही घेता येणार आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत 996 आजारांवरील उपचाराची सोय असून पंतप्रधान जीवनदायी योजनेत 1209 आजारांवर उपचार केले जातात. राज्यातील जवळपास 85 टक्के नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र 23 मे रोजी आरोग्य विभागाने काढलेल्या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका धारकांसह राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधा मिळणार आहे. तो येाजनेचा लाभार्थी नसला तरी हा लाभ मिळणार आहे.

युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत असून 31 जुलैपर्यंत या नव्या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील त्यातही मुंबईतील करोनाच्या रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेऊन बहुतेक शासकीय व पालिका रुग्णालयांचे करोना रुग्णालयात रुपांतर करण्यात येत आहे. करोना रुग्णांसाठी आगामी काळात खाटा कमी पडू नयेत व करोना नसलेल्या रुग्णांनाही व्यवस्थित उपचार मिळावे यासाठी सर्वच नागरिकांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे.

महत्वाचे शासकीय रुग्णालयांत 120 आजारांवर उपचार घेण्यासाठीचे तयार केलेल्या विशेष पॅकेज योजनेचा लाभ आता या योजनेतील अन्य खाजगी रुग्णालयातही घेता येणार आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेची मुदत निश्चित करण्यात आली असली तरी राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन गरज वाटल्यास या योजनेला मुदतवाढ दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *