88 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० मार्च । महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या आद्य स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगी मातेच्या चैत्रोत्सवास आजपासून (30 मार्च) सुरुवात होत आहे,30 मार्च ते 6 एप्रिल पर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवासाठी दरवर्षी हजारो भाविक नाशिक जिल्ह्यातील स्पतश्रृंगी गडावर दर्शनासाठी जातात. या उत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून प्रशासनानं जय्यत तयारी केलीय. त्याचबरोबर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनानं एक गुड न्यूजही दिली आहे.
कसा आहे कार्यक्रम?
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी प्रमुख पाहुणे आणि भक्तांच्या उपस्थितीत कार्यलयापासून ते मंदिरापर्यंत सुवर्ण अलंकारांची मिरवणूक काढण्यात येईल, प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या हस्ते देवीची पंचामृत महापूजा होईल. त्यानंतर दुपारी बारा वाजता मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडेल. या चैत्रोत्सव काळात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ भगवतीची महापूजा होईल.
भाविकांना गुड न्यूज
चैत्रोत्सवात दूरवरून भावीक सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक भाविकांना या प्रवासामुळे उशीर होतो आणि दर्शन घेता येत नाही. त्यांची गैरसोय ठाळण्यासाठी चैत्रोत्सवाच्या काळात मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांच्या दर्शनाची गैरसोय ठळणार आहे.
चैत्रोत्सव काळात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने काळजी घेतली आहे. यात्रोत्सव काळात नांदुरी ते सप्तशृंग गड खाजगी वाहनांसाठी बंद असणार आहे. 256 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मार्फत परिसराची निगराणी ठेवण्यात येईल.
सप्तशृंग गडावर बंदोबस्तासाठी एक पोलीस उपधीक्षक,पाच निरीक्षक, 25 उपनिरीक्षक, 250 पोलीस, आणि 300 गृहरक्षक दलाचे जवान, राज्य राखीव शीघ्रकृती दलाची 1 तुकडी असा बंदोबस्त असेल.
एकूण पंधरा ठिकाणी दर्शनाच्या बाऱ्या लावण्यासाठी व्यवस्था आहे. वीस ठिकाणी डिजिटल सूचना फलक लावण्यात आलाय. सप्तशृंग ट्रस्टमार्फत यात्रा कालावधीत सकाळी 11 ते रात्री 10:30 या वेळेत मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी 24 तास वैद्यकीय सेवा आणि मोफत औषधोपचार दिले जातील. खाजगी वाहनांसाठी नांदुरी येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.