महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ एप्रिल । राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. राज्यात कमाल तापमानाचा पारा 38 अंशांवर गेला आहे. अशातच राज्यात पुन्हा हवामानात बदल होऊन काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आज पुर्व विदर्भात पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
5 एप्रिलला येथे पाऊस
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलला पुर्व विदर्भातही पावसाची शक्यता कमी होईल. केवळ 3 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली येथे तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, असा अंदाज आहे.
मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रातही अवकाळीची शक्यता
6 व 7 एप्रिलला मराठवाड्यातील काही भाग व दक्षिण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तब्बल 11 जिल्ह्यांत हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिलरोजी अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.