राज्यात वीजमागणीचा उच्चांक; तापणाऱ्या उन्हामुळे मार्च ते मे महिन्यात विजेला वाढती मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ एप्रिल । राज्याच्या (मुंबई वगळून) वीजमागणीने मंगळवार, ४ एप्रिलला २४ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला. दुपारी ३.२०दरम्यान ही मागणी २४ हजार ३८३ मेगावॉटच्या कमाल स्तरावर गेली होती. हा या मोसमातील मागणीचा उच्चांक ठरला.

तापणाऱ्या उन्हामुळे मार्च ते मे महिन्यात विजेला उच्चांकी मागणी असते. त्यानुसार मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मागणीने २३ हजार ९०० मेगावॉटचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर पावसाळी वातावरणामुळे मागणी सातत्याने २२ हजार ८०० ते २३ हजार २०० मेगावॉटदरम्यानच होती. मागील आठवड्यात तिने २३ हजार ५०० मेगावॉटचा टप्पा पार केला. मंगळवारी मात्र २४ हजार मेगावॉटचा टप्पा ओलांडला.

राज्यात मुंबई शहर व उपनगरांतील निवडक भाग वगळून उर्वरित ठिकाणी राज्य सरकारी महावितरण कंपनीकडून वीजपुरवठा केला जातो. महावितरण राज्य सरकारी महानिर्मिती, काही खासगी उत्पादक व अपारंपरिक ऊर्जास्रोतांमधून वीज खरेदी करते. मंगळवारी मागणीने २४ हजार ३८३ मेगावॉटचा कमाल टप्पा गाठला त्यावेळी महानिर्मितीकडून जवळपास सात हजार ८५१ व खासगी उत्पादकांकडून आठ हजार ९११ मेगावॉट वीज कंपनीला मिळाली. तर जवळपास नऊ हजार ५७१ मेगावॉट विजेची बाहेरून विविध स्रोतांमधून खरेदी करण्यात आली.

दुसरीकडे महावितरणची वीजमागणी पूर्ण करताना महानिर्मितीच्या औष्णिक उत्पादनाने या मोसमात पहिल्यांदा साडेसहा हजार मेगावॉटचा टप्पा पार केला. कमाल मागणीवेळी कंपनीने सहा हजार ६७२ मेगावॉट औष्णिक विजेचे उत्पादन केले. कोळशाच्या उपलब्धतेची स्थिती पाहता सहा हजार ६७२ मेगावॉट वीजउत्पादन महत्त्वाचे ठरले आहे. कंपनीची ही क्षमता नऊ हजार मेगावॉट आहे, हे विशेष.

भार नियंत्रणासाठी २४ तास नियंत्रण कक्ष
वीजमागणी व वीजपुरवठा यांचा समतोल साधला न गेल्यास वीजवाहिन्यांवर भार येण्याची भीती असते. मुंबईबाबत अशा घटना याआधी दोन वेळा झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर २४ हजार ३८३ या कमाल विजेचा पुरवठा करताना महापारेषण ही राज्य सरकारी कंपनी सज्ज होती. अशाप्रकारच्या भार नियंत्रणासाठी कंपनीने २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला असून, कळवा येथील राज्य भारप्रेषण केंद्राकडून सर्व पारेषण वाहिन्यांवर देखरेख ठेवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *