महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ एप्रिल । राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे काही ठिकाणी उकाडाही वाढला आहे. मुंबईतही तापमाना वाढ झालेली दिसून आली आहे. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी आहे.
पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर शेतात काम करत होता. उन्हामुळे त्याला चक्कर आल्याने तो शेतात खाली कोसळला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती देण्यात आली आहे. प्रेमसिंग हा शेतीमजुरीचे काम आणि जेसीबी चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. सोमवारी सकाळी शेती कामासाठी गेला असता दुपारी शेतात काम करताना चक्कर आली आणि शुद्ध हरपली.
शुद्ध गेल्याने त्यांना उठविण्यासाठी तोंडावर पाणी मारण्याचा सोबत असलेल्या दुसऱ्या मजूराने केला. मात्र, प्रेमसिंग याची काहीही हालचाल जाणवून आली नाही. त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी या शेतमजुराला मृत घोषित केले. प्रेमसिंग यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
राज्यात उष्णतेचा पारा वाढलाय
राज्यात एप्रिल महिना तापदायक ठरतोय. कारण सर्वत्र उष्णतेचा पारा चढलाय.. पुण्यात तर रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलीय. कोरेगाव पार्कमध्ये पारा 42.1 अंशांवर पोहोचला आहे. त्याशिवाय चंद्रपूर, सोलापूर, परभणी, जळवागात पारा चाळीशीपार पोहोचला. पुढील काही दिवस राज्यातल्या काही जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. जळगावात उष्माघातामुळे काल एका व्यक्तीचा मृ्त्यू झाला. तेव्हा तापमान वाढत असताना नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले आहे.