महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ एप्रिल । एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. वातावरणातील उकाडा वाढल्याने बहुतांश शहरांतील तापमानाने चाळिशी पार केल्याने महाराष्ट्र होरपळला आहे. हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार उत्तर महाराष्ट्रातील भुसावळमध्ये पार्याने 43.3 अंश सेल्सिअसवर उसळी मारली. त्यापाठोपाठ 43.2 अंश सेल्सिअस तापमानाने होरपळलेले चंद्रपूर राज्यातील दुसरे उष्ण शहर ठरले. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश शहरांच्या तापमानाने चाळिशी ओलांडली आहे.
गेल्या आठवडाभरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र या पाठोपाठ आता सूर्यनारायणाने आग ओकण्यास सुरुवात केली. त्यामुळे ढगाळ वातावरण असताना देखील प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. तथापि, हवामान खात्याने वळवाच्या पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकर्यांमध्ये पुन्हा धास्ती निर्माण झाली आहे. राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. मुंबईत तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान 31 अंश सेल्सिअसवर पोहोचले तर हवेतील आर्द्रता 41 वर नोंदवली गेली.
परभणी : परभणीचे तापमान 40 च्या पुढे गेल्याने प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागत आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत.
चंद्रपूर : मार्च महिना लोटल्यानंतरही चंद्रपूरचा खास उन्हाळा सुरू झालेला नव्हता. ठरावीक अंतराने येणारी वादळे व अवकाळी पाऊस यामुळे चंद्रपूरचा पारा 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला. मात्र गुरुवारी अचानक यात वाढ झाली. 43.2 असे उच्चांकी तापमान नोंदवत चंद्रपूर देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून गणले गेले.
मालेगाव : आज मालेगाव शहरासह परिसरात पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला. पारा 39.02 अंशावर वाढला आहे. ढगाळ वातावरण असले तरी उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेमुळे रस्ते निर्मनुष्य होत आहेत.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील हॉट सिटी समजल्या जाणार्या भुसावळ शहराचा पारा सलग दुसर्या दिवशी देखील 40 पार राहिला. फेब्रुवारी महिन्यापासूनच भुसावळच्या तापमानाने चाळीशी ओलांडली. वातावरणात बदल झाला. त्यामुळे तापमान 43.3 अंशावर पोहोचले आहे.
धुळे : जिल्ह्यामध्ये उष्णतेत वाढ झाली असून तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला आहे. महत्त्वाचे म्हणजे ढगाळ वातावरण असले तरी उष्णता कायम असल्याने जीवाची लाही लाही होत आहे. दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे.
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात एप्रिल महिना आता अर्ध्यावर आला. एवढा काळ अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आरामात निघून गेला. जिल्ह्याचे कमाल तापमान गुरुवारी 40.4 अंशावर पोहोचले होते. हे यंदाचे सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.
नांदेड : जिल्ह्यात मार्च महिन्यात काही ठिकाणी झालेल्या गारपिटीसह वळवाच्या पावसाने वातावरणात ओलावा टिकून होता. त्यामुळे आजवर उन्हाळ्याची तीव्रता जाणवली नाही. मात्र आता नांदेडचे कमाल तापमान 40 अंशावर पोहोचल्याने उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे.