महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ एप्रिल । ऐन उन्हाळ्यात थंड हवा महागणार आहे. एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढली असतानाच एसी, कुलर, पंख्यांच्या महागाईच्या झळा ग्राहकांना सहण कराव्या लागणार आहेत. थंड हवेची यंत्रसामुग्री बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे वर्ध्यात एसी, कुलर, पंख्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तरीही उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाजारात ग्राहकांची संख्याही वाढली आहे.
कुलरच्या दरात वाढ
यंदाच्या सिझनमध्ये 3 हजार रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंतचे कूलर्स बाजारात उपलब्ध झाले आहेत. कूलर बनविण्यासाठी लागणारी मोटार, फॅन, पत्रा, स्टील, वाळा (ताट्या) आदी साहित्यामध्ये भाववाढ झाल्याने कूलरच्या किमती 500 ते 800 रुपयांनी वाढल्या आहेत. कॉपर आणि लोखंडाचे दर वाढले आहेत. परिणामी कूलरमध्ये असलेल्या मोटारीच्या किमती वाढल्या आहेत. दिवसेंदिवस इंधनाचे भाव वाढत असल्याने त्याचे परिणाम आता वाहतूक खर्चावर होत आहे. वाहतूक खर्च वाढल्यास या सर्व वस्तूंच्या किमतीत आणखी काही टक्क्यांची वाढ होणार आहे.
वर्ध्यात पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत
वर्धा शहरात उन्हाचा पारा 37 अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. थंड हवेशिवाय उन्हाळा काढणे अशक्य आहे. त्यामुळे कूलर खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे. स्टील आणि तांबे यासारख्या धातूंच्या किंमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च देखील वाढला आहे.