ट्विटरचा मोठा निर्णय रात्रीपासूनच लागू; काय आहे निर्णय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने लीगेसी व्हेरिफाईड अकाऊंट म्हणजे अनपेड अकाऊंट्सची ब्ल्यू टिक हटवली आहे. कंपनीचे मालक एलन मस्क यांनी याबाबतची घोषणा यापूर्वीच केली होती. 20 एप्रिलनंतर ज्यांनी पेड सब्सस्क्रिशन घेतले नाहीत, त्यांची ब्ल्यू टिक हटवली जाईल, असं एलन मस्क यांनी म्हटलं होतं. त्यानुसार गुरुवारी रात्री 12 वाजल्यापासूनच ब्ल्यू टिक हटवण्यात आली आहे. त्यामुळे आता कुणालाही ब्ल्यू टिक हवी असेल तर दर महिन्याला चार्ज करावा लागणार आहे. त्यामुळे आपल्या ट्विटरला ब्ल्यू टिक असल्याची शेखी मिरवणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

एलन मस्क यांनी 12 एप्रिल रोजी लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक हटवण्याची घोषणा केली होती. 20 एप्रिलनंतर लीगेसी व्हेरिफाईड ब्ल्यू टिक मार्क व्हेरिफाइड अकाऊंटवरून हटवली जाईल, असं त्यांनी म्हटलं होतं. तुम्हाला ब्ल्यू टिक हवी असेल तर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागणार असल्याचंही मस्क यांनी म्हटलं होतं.


सुरुवात कुठून?
यापूर्वी ट्विटर राजकीय नेते, अभिनेते आणि पत्रकारांसहीत प्रसिद्ध व्यक्तींच्या अकाऊंट्सला ब्ल्यू टिक देत होता. त्याचे कोणतेच चार्ज आकारले जात नव्हते. मात्र, एलन मस्क यांनी कंपनी खरेदी केल्यानंतर मोठा बदल करण्यात आला आहे. ट्विटरने पेड ब्ल्यू टिक सर्व्हिस सुरू केली आहे. सुरुवातीला त्याची अमेरिका, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये अंमलबजावणी करण्यात आली. जे लोक सर्व्हिससाठी ठरावीक रक्कम भरतील त्यांनाच ब्ल्यू टिक देण्यात आली आहे.

ब्ल्यू टिक कशी मिळणार?
यूजर्सला ब्ल्यू टिक हवा असेल किंवा आताची ब्ल्यू टिक कायम ठेवायची असेल तर त्याला ट्विटरवर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागेल. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सस्क्रिप्शन 650 रुपये एवढे आहे. मोबाईल यूजर्ससाठी दरमहिन्याला 900 रुपये मोजावे लागणार आहेत.

आता गोल्डन आणि ग्रे टिकही
यापूर्वी ट्विटरवर व्हेरिफाईड अकाऊंटसााठी केवळ ब्ल्यू टिक दिले जात होते. आता तीन प्रकारचे मार्क देण्यात येणार आहे. सरकार संबंधित खात्यांना ग्रे टिक, कंपन्यांना गोल्डन टिक आणि इतर व्हेरिफाईड अकाऊंटला ब्ल्यू टिक देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *