राज्यात दोन दिवस पावसाचा अंदाज ; गारपिटीमुळे तापमान किंचित घसरले

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । राज्यातील बहुतांश भागांत गुरुवारी गारपिटीसह हलका पाऊस झाल्याने तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली. 23 एप्रिलपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत दिवसा ऊन, तर सायंकाळी पाऊस असे वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी राज्यातील पुणे, नाशिक, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, जालना, बीड, जळगाव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडला; तर काही भागांत गारपीट झाली.

पुणे शहरात दुपारी 3 ते 4 या वेळेत वादळी वार्‍यासह गारपीट झाली. मुसळधार पावसात सतत गारांचा वर्षाव सुरू होता. हवामान विभागाचे सतत अलर्ट येत होते. बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे, तर अरबी समुद्राकडून उष्ण वारे यांची टक्कर राज्यात होत असल्याने उष्णतेच्या प्रकोपानंतर सायंकाळी जलधारा बरसत आहेत. असे वातावरण 23 एप्रिलपर्यंत राहील. दरम्यान, काही जिल्ह्यांत मात्र उष्णतेची लाट कायम आहे. यात विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच मुंबई, परभणी, नांदेड या भागांतही तापमानाचा पारा वाढला आहे.

पुण्यात तासभर गारांचा पाऊस!
पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत शहरासह आजूबाजूच्या परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. यंदाच्या हंगामातील ही मोठी गारपीट होती.

वाटचाल 44 अंशांकडे
ब्रह्मपुरी 43.8, गोंदिया 43.5, चंद्रपूर 42.8, अकोला 42.4, अमरावती 42.2, पुणे 40, मुंबई 34.6, सांताक्रूझ 38.8, रत्नागिरी 33.7, कोल्हापूर 39.5, नाशिक 38.8, जळगाव 39.9, सांगली 39.7, सातारा 39.9, सोलापूर 42.2, महाबळेश्वर 33.2

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *