अदानी पवारांच्या भेटीला ; ‘सिल्वर ओक’वर 2 तास चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ एप्रिल । अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. उभयतांमध्ये सुमारे दोन तास झालेल्या चर्चेचा विषय अद्याप गुलदस्त्यात आहे. तथापि, ही भेट पूर्वनियोजित होती, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हिंडेनबर्ग अहवालामुळे उद्योजक गौतम अदानी यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अदानी उद्योगसमूहातील कथित व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करण्याची आग्रही मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी लावून धरल्यामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज होऊ शकले नव्हते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी ‘जेपीसी’ऐवजी ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीकडून होणे न्यायसंगत ठरेल, अशी भूमिका मध्यंतरी मांडली होती.

‘जेपीसी’त सत्ताधारी पक्षाचे अधिक आणि विरोधी पक्षांचे कमी सदस्य असतात. त्यामुळे ‘जेपीसी’ चौकशीतून काहीही निघणार नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे होते. हिंडेनबर्ग कोण ते माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाची समिती अधिक विश्वासार्ह आहे, असे त्यांनी म्हटल्यानंतर विरोधी पक्षांत विविध मतप्रवाह उमटू लागले. त्यामुळे शरद पवार यांनी विरोधकांच्या संयुक्त संसदीय समितीच्या मागणीला आपला आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असे घूमजावही केले होते.

या पार्श्वभूमीवर उद्योजक गौतम अदानी आणि शरद पवार यांच्यात बैठक झाली की, अन्य ख्यालीखुशालीच्या विषयावर गप्पा झाल्या याबाबत राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *