पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह देशातील या राज्यांना हवामान विभागाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । देशातील बहुतांश भागात या महिनाअखेर उष्णतेच्या लाटेची स्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र, तेलंगण आणि मध्यप्रदेश व छत्तीसगडच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत आज, मंगळवारपासून २७ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने सोमवारी वर्तवला. या पावसामुळे तापमानात घट झाल्याने उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात रविवारी तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. उर्वरित भारतात तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. पश्चिम हिमालय प्रांतात तापमानाचा पारा १५ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिला, असे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. ‘येत्या सात दिवसांत देशात उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही,’ असेही विभागाने सांगितले आहे.

पश्चिम हिमालय प्रांतात २६ एप्रिलपासून, तर वायव्येकडील मैदानी प्रदेशात २८ एप्रिलपासून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारपट्टी भाग, तेलंगण, केरळमध्येही जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात २८ एप्रिलला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सातारा : महाबळेश्वरमधील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात सोमवारी पहाटे नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वरमधील अन्य भागांतही तापमान १२ अंशांपर्यंत घसरले होते. गेले दोन दिवस महाबळेश्वरला वीकेंडमुळे गर्दी असून, ऐन उन्हाळ्यात थंड वातावरणाचा आनंद पर्यटक घेत आहेत. महाबळेश्वर येथे गेल्या दोन दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *