महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ एप्रिल । उकाड्याने त्रस्त झालेल्या राज्यातील महावितरणसह इतर सर्व कंपन्यांच्या वीज ग्राहकांना वीज देयकातील वाढीचा उष्माघात आता सहन करावा लागणार आहे. नव्या वीजदरांसोबतच या महिन्यातील वीज देयकांत दोन महिन्यांच्या सुरक्षा ठेवीची रक्कमही जोडण्यात आली आहे. परिणामी, मागील वर्षभरातील (सन २०२२-२३) सरासरी वीज देयकाच्या दोन महिन्यांइतके देयक ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणून नियमित देयकाव्यतिरिक्त जमा करावे लागणार आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही ठेव एका महिन्याच्या देयकाइतकी होती.
वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनीकडे ठराविक रक्कम जमा ठेवणे बंधनकारक असते. वास्तवात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी देयकाइतकीच असते. परंतु वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी याविषयी सन २००३ मध्ये वीज नियामक आयोगात बाजू मांडत ही ठेव एक महिन्याच्या देयकाइतक्या रकमेवर आणली होती; परंतु आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियमांमध्ये बदल करीत, पुन्हा वर्षभरातील सरासरी देयकाच्या दोन महिन्यांइतकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.