महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ एप्रिल । राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असताना आपल्याला याची माहिती नसल्याचे सांगत मुख्यमंत्री बदलायचा असेल तर आम्हाला कुणी सांगायचे कारण नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेबावत संशयाचे भूत कायम असतानाच आता भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लागले आहेत. संजय राऊत यांनीही दिल्लीत मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी संजय राऊत पत्रकारही आहेत. पत्रकारांना अधिक माहिती असते, अशी टिप्पणी केली.
अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी बॅनर लावलेत त्यांनी हा वेडेपणा करू नये, असे अजित पवार यांनीच म्हटले आहे, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदाबाबत माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा नाही. ठाकरेंनी मला प्रस्ताव दिला अशी बातमी कुणी तरी अशीच तयार केली आहे. माझ्या दृष्टीने त्याला काही महत्त्व नाही, असेही पवार म्हणाले.