एसटीची 1 मेपासून धुळे ते पुणे सुपरफास्ट सेवा, पाहा किती आहे तिकीट ?, किती वाजता सुटणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० एप्रिल । एसटी महामंडळाच्या अनेक नव्या योजनांचे उद्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर लोकार्पण होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाला नुकत्याच माईल्ड स्टील बांधणीच्या बीएस – 6 श्रेणीच्या नव्या कोऱ्या दहा बसेस मिळाल्या होत्या. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनूसार उद्यापासून धुळे ते पुणे मार्गावर अतिजलद सेवा सुरू करण्यात येत आहे. या नव्या सेवेद्वारे म्हणजे खाजगी ट्रॅव्हल्सवर मात करण्याची महामंडळाची योजना आहे.

अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर धुळे आगाराला माईल्ड स्टील बांधणीच्या नव्या कोऱ्या बीएस- श्रेणीच्या बसेस पुरविण्यात आल्या होत्या. आता प्रवाशांच्या वाढती मागणी पाहून उद्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या बसेसचा वापर धुळे ते पुणे या मार्गासाठी देखील होणार आहे. ही बस रात्री 10.10 वाजता देवपुर बसस्थानकातून सुटणार आहे. या बसला कालिका माता मंदिरजवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंटवर देखील प्रवाशांसाठी 5 ते 10 मिनिटांचा थांबा देण्यात येणार आहे. त्यानंतर धुळे स्थानकातून उर्वरीत प्रवाशांना घेऊन ही बस सकाळी साडे दहा वाजता पुण्यासाठी रवाना होणार आहे. धुळे येथून एकदा का ही बस मार्गस्थ झाल्यानंतर ती थेट पुण्यालाच थांबा घेणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ऑनलाईन आरक्षण
दापोडी कारखान्यात बांधण्यात आलेल्या नवीन माईल्ड स्टील बांधणीच्या बसेस या 2 बाय 2 आसनांच्या आहेत. त्यात 41 प्रवासी आसने असून ही नव्या बी.एस.- 6 मानकांनूसार तयार करण्यात आली आहे. शिवाय या बसचे तिकीटांचे आरक्षण ऑनलाईन देखील करता येणार आहे.

पुण्यात नोकरीसाठी जाणाऱ्यांची सोय
बसचे धुळे ते पुणे आरक्षण खर्चासह भाडे 530 रूपये आहे, 5 ते 12 वर्षांवरील मुले, महिला आणि 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आदी अर्ध्या तिकीटात 265 रूपयांत प्रवास करता येणार आहे. धुळे जिल्ह्यातून महानगर पुण्यात नोकरी, कामधंद्यासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्या धुळे ते पुणे अतिजलद नॉनस्टॉप बससेवेचा फायदा कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *