महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे देशातील कुस्तीच्या सर्व घडामोडी थांबल्या आहेत. राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, सराव शिबिर हे सर्व सुरू होण्यासाठी मी फाशीवरही जाण्यास तयार आहे, असे मत भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांनी व्यक्त केले आहे.
देशातील सर्व कुस्ती घडामोडी थंड पडल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हीच स्थिती आहे. पाहिजे तर मला फाशी द्या, पण कुस्तीच्या या घडामोडी थांबू देऊ नका, ज्युनियर आणि किशोरवयीन कुस्ती खेळाडूंच्या तयारीवर याचा परिणाम होत आहे. मुलांच्या भवितव्याशी खेळू नका, महाराष्ट्र, तमिळनाडू, त्रिपुरा जेथे शक्य आहे तेथे मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळवा, पण खेळाच्या स्पर्धा सुरू करा, असे बृजभूषण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बृजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करत साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंसह काही कुस्तीगीर जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही त्याची दखल घेतली आहे. बृजभूषण यांच्याविरुद्ध एफआयआर करा, असा आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पुढचे पाऊल उचलले आहे.
बृजभूषण यांना अटक का नाही : सिद्धू
दरम्यान, सोमवारी माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिद्धू यांनी आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंची भेट घेतली. त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. ‘पोक्सो’ या जामीन नसलेल्या कायद्यानुसार बृजभूषण यांच्यावर एफआयआर करण्यात आला असेल, तर त्यांना अटक का केली जात नाही, असा प्रश्न सिद्धू यांनी उपस्थित केला. दररोज एक तरी राजकीय नेता कुस्तीपटूंची भेट घेत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वीच बृजभूषण यांच्याविरुद्ध एफआयआर करण्यात यायला हवा होता, असे सांगत सिद्धू यांनी दिल्ली पोलिसांच्या हेतूवर शंका उपस्थित केली. काय योग्य काय अयोग्य हे मला कळते, परंतु ही परिस्थिती फारच वाईट आहे.
लोकांसमोर एफआयआर जाहीर न केल्यामुळे तो कमकुवत असू शकेल, असाही आरोप सिद्धू यांनी केला आहे. सिद्धू यांनी बृजभूषण यांची निःपक्ष चौकशी होण्याबाबतही शंका उपस्थित केली. चौकशी समिती नेमणे म्हणजे हे प्रकरण लांबवण्यासारखे होते. न्यायालयीन चौकशी व्हायला हवी होती, अशी मागणी करत सिद्धू यांनी हा महिला कुस्तीपटूंच्या सन्मानाचा लढा असल्याचे सांगितले.