महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २ मे । यशस्वी जयस्वालकडे सतत शिकत राहण्याची वृत्ती कमालीची आहे. आयपीएलमध्ये तो खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघासाठीच नव्हे, तर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लंबी रेस का घोडा आहे, असे तोंडभर कौतुक राजस्थान संघाचे क्रिकेट संचालक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा यांनी त्याचे केले आहे.
२१ वर्षीय जयस्वाल यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ४७.५६ च्या सरासरीने त्याने ४२८ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. यात तीन अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश आहे.
यशस्वीकडे केवळ अफलातून गुणवत्ताच आहे असे नाही तर कठोर मेहनत घेण्याची क्षमता आहे. तयारी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये प्रगती करण्यासाठी तो तासन् तास वेळ देत असतो, असे संगकारा यांनी राजस्थान-मुंबई सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या तीनचार वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे. त्यामुळे त्याने केलेली मेहनत आणि प्रगती मी जवळून पाहिली आहे. तो ध्येयाचा किती पक्का आहे हे आपण आता पाहतच आहोत, असे संगकारा यांनी आवर्जून सांगितले.
वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेला राजस्थान-मुंबई यांच्यातला सामना कमालीचा रंगला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात मुंबईने अखेरच्या षटकात विजय मिळवला. टीम डेव्हिडने तीन चेंडूंवर तीन षटकार मारून मुंबईला विजयी केले, परंतु राजस्थानकडून ६२ चेंडूत १२४ धावांची नेत्रदीपक खेळी करणाऱ्या यशस्वीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.
यशस्वीने कमालीची फलंदाजी केली. पूर्ण २० षटके तो मैदानावर होता. त्याची खेळी असामान्य अशीच होती. त्याचा एकूणच प्रवास पाहता तो राजस्थान संघासाठीच नव्हे, तर भारतासाठी प्रदीर्घकाळ खेळू शकणारा फलंदाज आहे. सातत्याने धावा करून तो भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे, अशा शब्दांत संगकारा यांनी यशस्वीच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
सर्वांच्या नजरेत भरणारी अशी चौफेर फटकेबाजी करणारी खेळी यशस्वीने वानखेडे स्टेडियमवर सादर केली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवरही त्याने सहजतेने षटकारांची पेरणी केली. संगकारा पुढे म्हणतात, केवळ चांगले फटके मारणेच नव्हे, तर आपल्या क्षमतेवर यशस्वीचा भरवसा आहे. खेळाची त्याला चांगली जाण आहे. परिस्थितीनुसार तो बदल करत असतो, हे गुण मोठ्या खेळाडूकडे असतात, अशी स्तुती त्याने केली.
या आयपीएलअगोदर तो पॉवर प्लेमध्ये एवढी चांगली टोलेबाज करत नव्हता. वेगवान गोलंदाजीसमोर त्याची सरासरीही चांगली नव्हती, पण रविवारच्या खेळीतून आपण काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले, असे मत संगकारा यांनी मांडले. आयपीएलच्या पूर्वार्धात राजस्थानने छान कामगिरी केली आहे. राजस्थानच्या आतापर्यंतच्या यशात यशस्वीचा वाटा मोलाचा आहे. भविष्यात त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडू शकतात.
पुढचा सुपरस्टार : रॉबिन उथप्पा
भारताचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने तर यशस्वी जयस्वाल भारतीय संघाचा सुपरस्टार खेळाडू असेल असे भाकित केले. मैदानात उतरल्यापासून तो आपले इरादे स्पष्ट करत असतो. केवळ आलेला चेंडू फटकवायचा या हेतूने नव्हे, तर विचार करून तो फटके मारतो. आतापर्यंत केलेली सर्व मेहनत त्याने यंदा प्रत्यक्षात उतरवली आहे, असे उथप्पाने सांगितले.