पुणे: चांदणी चौकातील नवीन उड्डाणपूल इतक्या महिन्यात पूर्णत्वाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३ मे । एनडीए चौकातील (चांदणी चौक) नव्या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम अद्याप सुरू आहे. मात्र, या चौकातील दैनंदिन वाहतुकीच्या प्रचंड वर्दळीमुळे कामात व्यत्यय येत असल्याने हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. तसेच पर्यायी सेवा रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पुलाचे पूर्ण काम होण्यास किमान दीड ते दोन महिने लागणार असल्याची स्पष्टोक्ती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) मंगळवारी करण्यात आली.

एनडीए चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आणि रस्त्यांचे उद्घाटन १ मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते. मात्र, उड्डाणपुलासाठी टाकण्यात येणाऱ्या गर्डरच्या कामासाठी लागणारी साधने वेळेत उपलब्ध झाली नाहीत. परिणामी पुलाचे काम लांबले आहे. या ठिकाणच्या नव्या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या उड्डाणपुलासाठी खांब उभे करण्यात आले असून, खांबांवर टाकल्या जाणाऱ्या गर्डरपैकी काही गर्डरचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.

याबाबत एनएचएआय, पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम म्हणाले, की एनडीए चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी एनएचएआयकडून उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. येथील नव्या उड्डाणपुलासाठी खांब उभारण्यात आले असले, तरी नियोजनाप्रमाणे लागणारे सिमेंट काँक्रीटचे गर्डर पूर्ण तयार नाहीत. तसेच हे गर्डर टाकण्यासाठी मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्याची शक्यता आहे. या मार्गावरील दैनंदिन वाहतूक पाहता झालेले गर्डर टाकण्याचे काम पुढील दीड ते दोन महिन्यांत करण्यात येईल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *