Sanjay Raut : लोक दोन दिवस पुस्तक वाचतात, पुन्हा ते..; पवारांच्या पुस्तकावर राऊतांची तिखट प्रतिक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ४ मे । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा चांगलाच चर्चेत ठरला आहे. याच सोहळ्यातून शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदावरुन पायउतार होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे, राज्यातील आणि राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर, महाविकास आघाडीच्या भवितव्यवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या पुढील वज्रमुठ सभाही होणार की नाही, याचीही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे पवारांनी पुस्तकात शिवसेना आणि महाविकास आघाडीवरही भाष्य केलंय. त्यावरील, एका विधानासंदर्भात संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रपर पुस्तकावर तिखट प्रतिक्रिया दिलीय.

भाजप आणि केंद्र सरकारवर मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना सातत्याने करत आहे. महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर वज्रमुठ सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता येत नाही म्हणून मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा, मुंबईला मारून टाकायचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही उद्धव यांनी केला. तसेच, मुंबई महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्यांचे तुकडे करू, अशा शब्दात त्यांनी भाजपला लक्ष्य केलं होतं. मात्र, शरद पवार यांनी आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्याही मनात नाही, असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे. ”मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो”, असे पवार यांनी म्हटलंय. त्यासंदर्भात माध्यमांशी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. तसेच, लवकरच उद्धव ठाकरे यांची महामुलाखत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र एकीकरण समितीमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. तसेच, शरद पवार यांच्या लोक माझे साांगाती या पुस्तकासंदर्भातही भाष्य केलं. या पुस्तकात केलेल्या दाव्यावर आणि मांडलेल्या मतावर राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. या पुस्तकात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कुणाचाही डाव नसल्याचं शऱद पवार यांनी म्हटलंय. तसेच, शिवसेनेचा वैचारिक पाया भक्कम नसल्याचेही म्हटटलंय. त्यावर, संजय राऊत यांनी, यावर उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देतील असे म्हटलं. मात्र, लोक पुस्तकं दोन दिवस वाचतात, पुन्हा ते ग्रंथालयात जातात, अशा शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी यापूर्वी अजित पवार, नाना पटोले यांच्याबद्दल विधानं करुन वाद ओढवून घेतला होता. आता, त्यांनी थेट शरद पवार यांच्या पुस्तकावर तिखट प्रतिक्रिया दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *