जेव्हा स्वत: बाळासाहेब राज ठाकरेंच्या शाळेत झाले होते हजर ; राज ठाकरेंनी सांगितला बालपणीचा प्रसंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ मे । मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी शैलीसाठी नेहमीच ओळखले जातात. सभांमधून त्यांची होणारी भाषणं हा खास चर्चेचा विषय असतो. मात्र, आत्ता कायम चर्चेत असणाऱ्या राज ठाकरेंचं बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली बालपण कसं गेलं असेल? हा प्रश्न सगळ्यांसाठीच उत्सुकतेचा ठरला आहे. यासंदर्भात खुद्द राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींनी वेगवेगळे किस्से सांगितले आहेत. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात बोलताना या दोघांनी राज ठाकरेंच्या बालपणीचे अनेक प्रसंग सांगितले. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे शाळेत असताना त्यांच्याविषयी आलेल्या तक्रारीची दखल घेऊन थेट बाळासाहेब ठाकरेच शाळेत कसे पोहोचले? याचा प्रसंग सांगितला आहे.

राज ठाकरे वर्गात बसले आणि…
राज ठाकरेंनी शाळेतला तो प्रसंग अगदी सविस्तर वर्णन करून सांगितला. “लहानपणी छोट्याशा गोष्टीही मोठ्या वाटायच्या. मी एकदा लहानपणी शाळेत गेलो आणि वर्गात बसलो. तेवढ्यात एक शिपाई आला. ठाकरे? मी शिपायाकडे पाहिलं. आदल्या दिवशी संध्याकाळी माझं थोडंसं भांडण झालं होतं दुसऱ्या मुलाशी. बोलवलं आहे. वर्गशिक्षिकांच्या खोलीत पोहोचल्यावर आम्हाला दोघांना गॅलरीत उभं केलं. शाळा सुटेपर्यंत आम्हाला उभं केलं होतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“शाळा सुटल्यानंतर त्या बाई आल्या आणि म्हणाल्या की उद्या पालकांना बोलव. ही त्यांची चूक झाली. दुसऱ्या दिवशी मी आईला सांगितलं तुला बोलवलंय”, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरेंनी यावेळी केली.

..आणि बाळासाहेब मुख्याध्यापकांच्या खोलीत पोहोचले!
“मी शाळेत आलो. बसलो. १० मिनिटांत पुन्हा शिपाई आला. ठाकरे, बोलवलंय. म्हटलं आज परत दिवसभर बाहेर उभं करतायत की काय. मी त्या शिपायाच्या पाठीमागून चालत गेलो. बापूसाहेब रेगेंची खोली पार करून दादासाहेब रेगेंच्या खोलीत आम्ही गेलो. मला वाटलं आता शाळेतून काढूनच टाकतायत की काय? आत पोहोचलो तेव्हा त्या दोन्ही वर्गशिक्षिका तिथे होत्या. त्या दोघी रडत होत्या. त्यांच्यासमोर बाळासाहेब बसले होते. माझे वडील बसलेले. दादासाहेब रेगे त्यांना ओरडत होते. बापूसाहेब रेगे बाजूला उभे होते”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी त्या खोलीतला प्रसंग वर्णन केला.

“आई शाळेत निघाली तेव्हा बाळासाहेबांनी वडिलांना विचारलं कुठे गेली? वडिलांनी त्यांना घडला प्रकार सांगितला. बाळासाहेबांनी त्यांना गाडीत बसवलं आणि तसेच शाळेत हजर झाले”, अशी आठवण राज ठाकरेंनी यावेळी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *