महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ मे । लाँग विकेंड असल्याने अनेकजण बाहेर पडतात. या आठवड्यात शुक्रवार ते रविवार असा लाँग विकेंड आला आहे. या विकेंडला तुम्ही मुंबई – पुणे असा एक्स्प्रेस वेने प्रवास करणार असाल ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
हायवे सेफ्टी पेट्रोलने (HSP) वाहन चालकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शुक्रवार ते रविवार अशा लाँग वीकेंड दरम्यान मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवरुन पुण्याच्या दिशेने जाताना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेने पुण्याच्या दिशेने जाताना गुगल मॅप वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तसंच या मार्गावरुन जाताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यास एसी बंद करा आणि खिडकी उघडण्याची सूचनाही हायवे सेफ्टी पेट्रोलने दिली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यास वाहन चालक हेल्पलाइन नंबरही डायल करू शकतात, अशी माहितीही देण्यात आली आहे.
हायवे सेफ्टी पेट्रोल बोरघाट युनिटचे पोलिस उपनिरीक्षक, महेश चव्हाण यांनी सांगितलं, की पुण्याकडे जाणाऱ्या अमृतांजन ब्रिज आणि मॅजिक पॉईंटच्या पलीकडे वाहतूक वाढल्यानंतर आम्हाला ती खंडाळा बोगदा आणि मुंबईकडे जाणार्या कॅरेजवेच्या बोरघाटाकडे वळवावी लागेल. असे ब्लॉक दर १५ मिनिटांनी होतील.
दरम्यान, मागील दोन वर्षांत पोलीस आणि राज्य परिवहन विभागासह विविध यंत्रणांनी अनेक मोहिमा राबवूनही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर लेन कटिंग आणि स्पिडिंग या दोन वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसतं.
लेन कटिंग हे वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन असून यात ड्रायव्हिंग शिक्षण देताना त्यात अभाव असल्याचं पुणे ट्रॅफिक मूवमेंटचे हर्षद अभ्यंकर यांनी सांगितलं. लोकांना ‘ब्लाइंड स्पॉट्स’ आणि लेन बदलण्याचे योग्य तंत्र शिकवलं जात नाही. जोपर्यंत ड्रायव्हिंग चाचण्या ६० सेकंदात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पूर्ण होत आहेत आणि पहिल्याच प्रयत्नात जवळपास शंभर टक्के लोक उत्तीर्ण होतात तोपर्यंत या समस्यांचे निराकरण करणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले.