पुणे: सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्यासाठी‘एमटीडीसी’कडून निविदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगड निवासस्थान भाडेतत्त्वावर देण्यासाठी पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महामंडळाच्या मुख्यालयाकडून ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवासस्थानी रात्रीच्या मुक्कामासाठी पर्यटकांचा अल्प प्रतिसाद मिळत असून कर्मचाऱ्यांची वानवा ही प्रमुख कारणे असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले. सन २०२१ पासून निवासस्थानाचे उद्घाटन झाल्यापासून ते बंदच आहे.

पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत महाबळेश्वर, पानशेत, माथेरान, माळशेज, कार्ला, भीमाशंकर आणि कोयनानगर अशी सात निवासस्थाने होती. त्यामध्ये सन २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात सिंहगड आणि अक्कलकोट या दोन निवासस्थानांची भर पडल्याने महामंडळाच्या पुणे विभागांतर्गत एकूण नऊ निवासस्थाने झाली. सिंहगड निवासस्थान हा बंगला पूर्वी रेव्हेन्यू वेल्फेअर असोसिएशनचा साधा बंगला होता. त्याच्या खोल्यादेखील साध्या होत्या. यापूर्वी हा बंगला भाडेतत्त्वावर दिला होता. सन २०२१ मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. गडावर पर्यटनची ३२ गुंठे जागा आहे. या जागेवर महामंडळाकडून पर्यटक निवास बांधण्यात आले होते. राज्य सरकारच्या पर्यटनच्या नवीन धोरणानुसार पर्यटक निवासाची दुरुस्ती आणि श्रेणीवाढ करणे आवश्यक होते. त्यानुसार, पर्यटक निवासाची कामे महामंडळाने केली आहेत. या पर्यटक निवास इमारतीची श्रेणीवाढ करताना अस्तित्वातील इमारतीमध्येच दोन सुट, एक व्हीआयपी सुट, एक लोकनिवास (डॉरमेटरी), व्यवस्थापक कक्ष, उपाहारगृह आणि डायनिंगची सुविधा केली आहे. दोन सुट, व्हीआयपी सुट वातानुकूलित केला आहे. सुटमध्ये आकर्षक सिलींग, आधुनिक फर्निचर बनविले असून आधुनिक स्वच्छतागृह केले आहे. या ठिकाणी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी अशा दोन लोकनिवास (डॉरमेटरी) आहेत. एका वेळी प्रत्येकी आठ पर्यटक येथे राहू शकतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *