महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ मे । राष्ट्रवादी पक्षात कार्याध्यक्ष नियुक्त केला जाणार, ही चर्चा शरद पवारांनी फेटाळली. मी राजीनामा दिल्यानंतर काही सहकाऱ्यांनी सुचवले की, तुम्ही अध्यक्षपदावर कायम राहा आणि सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करा, पण ती सूचना सुप्रिया आणि इतर सहकाऱ्यांना मान्य नव्हती असं पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा हट्ट तसेच देशभरातील समविचारी पक्षांच्या बड्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर शरद पवार यांनी आपला अध्यक्षपदाचा राजीनामा चौथ्या दिवशी मागे घेतला. भरगच्च पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले आणि बाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यापूर्वी, पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, असा ठराव पक्षाच्या अध्यक्ष निवड समितीच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बैठकीत शुक्रवारी सकाळी करण्यात आला आणि त्याची माहिती लगेच ‘सिल्व्हर ओक’वर जाऊन पवारांना देण्यात आली होती.
पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातील ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे, अशी माझी भूमिका होती. परंतु, या निर्णयाने जनमानसामध्ये तीव्र भावना उमटली. पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे ‘सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी एकमुखाने, काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषतः महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली. त्यामुळे आपण राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतला.
यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी अधिक जोमाने काम करेन, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. आपण माझ्या ‘सांगाती’ राहिलात त्याबद्दल मी आपला कायमचा ऋणी राहीन, अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.