पिंपरी चिंचवड : पावसाळ्या पूर्वी सर्व नाले साफ होणार?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मे । पिंपरी-चिंचवड शहरातील नाले सफाईचे काम सुरू आहे. पालिका प्रशासनाच्या नोंदीनुसार आतापर्यंत नाले सफाईचे काम केवळ 35 टक्के झाले आहे. सफाईचे हे प्रमाण कमी असून, येत्या 23 दिवसांत उर्वरित नाले स्वच्छ होणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरात छोटे व मोठे असे एकूण 150 नाले आहेत. या नाल्यात मोठ्या प्रमाणात राडारोडा व कचरा साचलेला असतो. पावसाचे पाणी वाढल्याने कचर्‍याच्या अडथळा निर्माण होऊन नाल्यातून पाणी वाहून न गेल्याने ते आजूबाजूच्या घरे व दुकानांमध्ये शिरते.

तसेच, रस्त्यावर पाणी साचून वाहतुक विस्कळीत होते. महापालिकेने बांधलेल्या या नाल्याची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई केली जाते. या कामास एप्रिल महिन्यात सुरूवात झाली आहे. आतापर्यंत केवळ 35 टक्के नालेसफाई झाली आहे. अद्याप बहुतांश नाले साफ करणे शिल्लक आहे. कामाचा सध्याचा वेग पाहता 31 मे रोजीपर्यंत सर्व नाले व्यवस्थित साफ होण्याची शक्यता कमी दिसत आहे.

पावसाळ्यापूर्वी सर्व नाले साफ होतील
शहरातील सर्व भागांतील छोटे व मोठे नाले स्वच्छ करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकामार्फत सुरू आहे. मोठे नाले व अधिक प्रमाणात कचरा असलेले नाले साफ करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. येत्या 31 मे रोजीपर्यंत सर्व नाले साफ केली जातील, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त विनोद जळक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *