महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मे । संजय राऊतांच्या सातत्यपूर्ण टीकेनं महाविकासआघाडीतील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शरद पवारांनी संजय राऊत आणि त्यांच्या अग्रलेखांवर जोरदार निशाणा साधला आहे, त्यामुळे संजय राऊतांनी आता पवारांचीही नाराजी ओढवून घेतली की काय? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सामनातून परखड टीका करण्यात आली. राष्ट्रवादीमध्ये नवीन नेतृत्व तयार करण्यात शरद पवारांना अपयश आल्याचं सामनामध्ये लिहिण्यात आलं. सामनातील याच टीकेला आता स्वत: शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. पक्षात आमचं काम राऊतांना माहीत नाही. आणि राजीनामा नाट्य असो किंवा अजित पवारांची गैरहजेरी हा आमचा घरातील प्रश्न आहे असं म्हणत, शरद पवारांनी राऊतांची कानउघाडणी केली आहे, तसंच आमच्या लेखी सामनाच्या अग्रलेखाचं महत्व नाही, असा टोलाही पवारांनी लगावला आहे.
खरंतर शरद पवारांचा हा पलटवार म्हणजे, राऊतांसह सामना वृत्तपत्राला चोख प्रत्युत्तर आहे. आतापर्यंत सत्ताधारी सामनावर निशाणावर साधत होते, पण आता शरद पवारांनी सामनाचा अनुल्लेख केल्यानं, ठाकरे गटाची कोंडी झाली आहे. पण, विनायक राऊतांनी मात्र सामनाच्या अग्रलेखांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सुरवात होते, असं म्हणत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे.
खरंतर राऊतांच्या सततच्या टीकेनं महाविकास आघाडीत सध्या संतापाची लाट आहे. काँग्रेस नेतृत्वावरील राऊतांच्या टिपण्णीनंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले, तर राष्ट्रवादीतील अंतर्गत बाबींवरील सामानातील लिखाण आणि भाष्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले आहेत, त्यामुळे आता पवारांच्या पलटवारांनंतर राऊतांविरोधात सुरु झालेली मोहीम शमते की तीव्र होते? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.