राष्ट्रीय डेंग्यू दिन : राज्यात पाच महिन्यांत डेंग्यूचे 925 रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मे । राज्यात गेल्या पाच महिन्यांत डेंग्यूचे 925 रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, वर्षभर डेंग्यू प्रतिबंधक उपक्रम राबवले जात आहेत. डेंग्यू रुग्ण संख्येमध्ये राज्याचा देशात आठवा क्रमांक, तर मृत्यूमध्ये सहावा क्रमांक आहे.

दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. ‘संरक्षण, प्रतिबंध आणि उपाय’ हे यंदाच्या दिवसाचे उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने ‘सुरक्षित राहा आणि डेंग्यूपासून स्वत:चा बचाव करा’ असा संदेश शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. लोकसंख्या वाढ, वाढते शहरीकरण, सार्वजनिक अस्वच्छता, डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.

डेंग्यूचा आजार जवळपास 100 देशांमध्ये पसरलेला असून, जगातील सुमारे 50 टक्के लोकसंख्या डेंग्यूच्या प्रभावाखाली असल्याचे दिसून येत आहे. आशियात भारत, इंडोनेशिया, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांमध्ये जगातील 30 टक्के प्रादुर्भाव दिसून येतो. भारतामध्ये 2022 मध्ये डेंग्यूचे 2 लाख 33 हजार 251 रुग्ण आढळून आले, तर 303 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात देशाच्या 3.67 टक्के रुग्ण, तर 8.91 टक्के मृत्यू आढळून आले आहेत.

ही काळजी घ्या…
घरातील, परिसरातील पाणी साठे वाहते करावेत.
साठवलेल्या पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत.
दहा घरांपैकी एका घरात अळ्या आढळून आल्या तरी साथ समजली जाते. त्यामुळे आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
दिवसा पूर्ण कपडे वापरावेत. रात्री मच्छरदाणीचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *