महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ मे । नागपूर येथील जयंत तांदुळकर हे सूक्ष्म कलाकृती बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी जगातील सर्वात लहान आकाराचा चरखा बनवला आहे. विशेष म्हणजे तो केवळ एक कलाकृती नसून या चरख्यावर खरोखरच सूत कातता येते. हा चरखा पूर्णपणे खर्या चरख्यासारखे काम करू शकतो. एखाद्या तांदळाच्या दाण्याइतक्या आकाराचा हा चरखा आहे.
महात्मा गांधीजींचा स्वदेशी संकल्प तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाने प्रेरित होऊन आपण हा चरखा बनवला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याची लांबी 3.20 मि.मी. व रुंदी 2.68 मि.मी. तसेच उंची 3.06 मि.मी. आहे. त्याचे वजन अवघे 0.04 ग्रॅम इतके आहे. हा चरखा बनवण्यासाठी छोटीशी काडी, स्टील वायर आणि कॉटनसारख्या वस्तूंचा वापर करण्यात आला. हा चरखा अत्यंत लहान आकाराचा असला तरी त्यावर मोठ्या चरख्याप्रमाणेच सूत कातता येते.
या चरख्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् आमि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झाली आहे. तांदुळकर यांनी या चरख्याशिवाय अन्यही अनेक सूक्ष्म कलाकृती बनवल्या आहेत. बाटलीच्या आत सूक्ष्म पलंग, पेन स्टँड, काडेपेटी अशा कलाकृती त्यांनी बनवल्या आहेत. तसेच सूक्ष्म बैलगाडी, सोफा सेट आणि टेबल-खुर्चीही त्यांनी बनवली आहे.