ब्लड प्रेशर मोजणारी अवघ्या पाच रुपयांची क्लिप

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३१ मे । अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब मोजणारी सर्वात स्वस्त क्लिप तयार केली आहे. या क्लिपला कोणत्याही स्मार्टफोनच्या फ्लॅश लाईटवर लावून रक्तदाब मोजता येऊ शकतो. ही क्लिप एका स्मार्टफोन अ‍ॅपसह काम करते. अशी क्लिप तयार करण्यासाठी सध्या सुमारे 5.6 रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अगदी 70 पैशांइतका कमी करता येऊ शकतो असाही संशोधकांचा दावा आहे.

या क्लिपच्या मदतीने अतिशय कमी किमतीत वृद्ध तसेच गर्भवती महिलांचा रक्तदाब तपासता येऊ शकेल. सध्याच्या रक्तदाब तपासणार्‍या उपकरणाची किंमत सुमारे 1 हजार रुपये इतकी आहे. सॅन दियागोच्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधील पीएच.डी. विद्यार्थी यिनान जुआन यांनी सांगितले की आम्ही ब्लड प्रेशर मॉनिटरिंगमध्ये येणारी किमतीची बाधा कमी करण्यासाठी हा उपाय केला आहे. या विद्यापीठातील डिजिटल हेल्थ लॅबचे संचालक आणि संशोधक एडवर्ड वांग यांनी सांगितले की कमी किमतीमुळे ही क्लिप कुणालाही सोपवता येऊ शकते.

जे लोक नियमितपणे दवाखान्यात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही क्लिप वरदान ठरू शकते. या क्लिपच्या मदतीने कोणत्याही अन्य उपकरणाच्या मदतीशिवाय आपण कधीही, कुठेही रक्तदाब तपासू शकतो. त्यासाठी क्लिपला फोनच्या फ्लॅश लाईटवर लावावे लागेल. ही क्लिप एका मोबाईल अ‍ॅपशी कनेक्ट राहील. हे अ‍ॅपच क्लिपच्या वापराची पद्धतही सांगेल. या क्लिपमध्ये एक ऑप्टिकल पिनहोलही आहे ज्यामध्ये आपल्याला बोट ठेवावे लागेल. बोट ठेवल्यावर फ्लॅश लाईट लागेल. त्यानंतर अ‍ॅपवर आपल्या रक्तदाबाची माहिती मिळेल. या क्लिपची 24 लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *