ॲशेस कसोटी क्रिकेट मालिका 2023 : पहिल्या चेंडू पासून आक्रमक खेळ करणार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन । इंग्लंड संघातील खेळाडूंकडून आम्ही सातत्याची अपेक्षा करत नाही. फलंदाजांनी प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करणे गरजेचे नाही. मात्र, त्यांनी केलेली कामगिरी सामन्याला कलाटणी देणारी, निर्णायक ठरली पाहिजे असे आमचे मत आहे, असे इंग्लंड कसोटी संघाचा साहाय्यक प्रशिक्षक पॉल कॉलिंगवूडने मंगळवारी सांगितले.

यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या ॲशेस कसोटी मालिकेला शुक्रवारपासून (१६ जून) सुरुवात होणार आहे. ब्रेंडन मॅककलमच्या मार्गदर्शनाखाली आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने १३ पैकी ११ कसोटी सामने जिंकले आहेत. तसेच या दोघांनी कसोटीतही पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळ करण्याची खेळाडूंना सूचना केली आहे. त्यामुळे इंग्लंडचे कसोटी सामने रंजक ठरत आहेत. आता ऑस्ट्रेलियाकडे जागतिक दर्जाचे खेळाडू असले, तरी ॲशेस मालिकेत आम्ही खेळण्याची शैली बदलणार नाही, असे कॉलिंगवूड म्हणाला. ॲशेस मालिकेचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्सवर करण्यात येईल.

‘‘चाहत्यांना कसोटी क्रिकेटकडे वळवणे, आक्रमक शैलीत खेळून कसोटी क्रिकेटमध्ये रंजकता आणणे हे आमच्या संघाचे लक्ष्य आहे. आमच्या फलंदाजांनी गेल्या वर्षभरात झालेल्या कसोटी सामन्यांत षटकामागे सहा किंवा त्याहून अधिकच्या गतीने धावा केल्या आहेत. तसेच आमच्या गोलंदाजांनी सपाट खेळपट्टय़ांवरही २० गडी बाद करून दाखवले आहे. त्यामुळे आमच्या सर्वच खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. समोर कोणताही संघ असला, तरी आक्रमक शैलीत खेळ करून विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,’’ असे कॉलिंगवूडने सांगितले.

‘‘आम्ही खेळाडूंकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा करत नाही. स्टोक्सने खेळाडूंना नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक दिली आहे. मॅककलमही आक्रमक खेळाला प्रोत्साहन देतो. पूर्वी फलंदाजाची धावगती, सरासरी पाहिली जायची. मात्र, आम्हाला खेळाडूंकडून निर्णायक ठरणारी कामगिरी अपेक्षित आहे,’’ असे कॉलिंगवूडने नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *