महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुन । जगामध्ये रक्तदानाला फार महत्व आहे. एखाद्याचे प्राण वाचण्यासाठी रक्त चढवावे लागते, अपघातात जखमींना उपचारासाठी, गरोदर स्त्री साठी तसेच इतर ऑपरेशनसाठी रुग्णांना रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया, ल्यूकेमिया, सिकलसेल या आजारातील व्यक्तींना वारंवार रक्त लागते.
थॅलेसेमिया या आजारातील बालकांना दर २० दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यांच्या शरीरात रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया जोपर्यंत कार्यक्षम होत नाही तोपर्यंत त्यांना कित्येक वर्षे वारंवार रक्त चढवावे लागते. म्हणूनच रक्तीदानाला जीवनदान म्हणतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची गरज भासते.
रक्तदान कोण करू शकतो?
ज्याचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले असेल, वजन ५० किलोपेक्षा जास्त असलेले आणि हिमोग्लोबिन १२.५ ग्रॅमपेक्षा जास्त असलेली व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते. रक्तदात्याला मधुमेह, रक्तदाबाचा त्रास, एड्स, कॅन्सर सारखे आजार नसावेत आणि वर्षभरात कावीळ, मलेरिया, टायफॉईड सारखे आजार झालेले नसावेत. कोविड प्रतिबंधात्मक लसचा दुसरा डोस घेतल्यापासून २८ दिवसांनी रक्तदान करू शकतात. रक्तदानामध्ये फक्त ३०० ते ४०० मिली रक्त घेतले जाते. रक्तदान केल्यापासून काही तासातच शरीरामध्ये रक्त निर्माण होते.
रक्ताचे विभाजन
रक्तपिशवीमधील रक्ताचे प्रोसेसिंगनंतर ४ भागांमध्ये विभाजन होते. RBC ज्याला आपण लाल रक्तपेशी म्हणतो ज्याचा उपयोग अतिरक्तस्राव झालेले रुग्ण, ऑपरेशन, सिकलसेल, ऍनिमिया, थॅलेसेमिया अशा रुग्णांकरिता होतो. लाला रक्तपेशी असणारे रक्त ३५ ते ४२ दिवस राहू शकतो. दुसरा घटक आहे प्लाझ्मा ज्याचा उपयोग गरोदरपणात स्त्रियांना, हार्ट, लिव्हर प्रत्यारोपण प्रक्रियेत आणि फार्मा कंपन्यांमध्ये होतो.
प्लाझ्मा १ वर्षापर्यंत वजा ३३ डिग्री सेल्सिअस तापमानात राहू शकतो. तिसरा घटक प्लेटलेट ज्याचा उपयोग कर्करोग, डेंग्यु , मलेरिया रुग्णांना होतो. प्लेटलेट प्रोसेसिंगपासून फक्त ५ दिवस राहू शकतात. चौथा भाग म्हणजे WBC पांढऱ्या पेशी ज्याचा सहसा उपयोग होत नाही. म्हणजेच एक रक्तदाता तीन व्यक्तींचे प्राण वाचवू शकतो.
रक्तदानाचे फायदे
एका रक्तदानातून तीन जणांचे प्राण वाचते, रोग प्रतिकार शक्ती वाढते, शरीरातील संचित कॅलरीजचे प्रमाण कमी होते, नियमित रक्तदानाने रक्तदाब, कर्करोग, हृदयविकार कोलेस्टेरॉल होण्याचे प्रमाण कमी होते.
जागतिक रक्तदाता दिन १४ जूनला का साजरा करतात?
डॉ. कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटांचा शोध लावला. त्यांच्या या महान संशोधनामुळे (research) रुग्णाला योग्य गटाचे रक्त देणे खूप सोईस्कर झाले. डॉ. लँडस्टीनर यांचा सोमवारी (ता. १४) जन्मदिवस. त्यांचा जन्मदिवस जागतिक रक्तदान दिन (world blood donor day) म्हणून साजरा करण्यात येतो.