महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुन । हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये बड्या अभिनेत्यांवर चित्रीकरणादरम्यान वाहवत गेल्याचा, चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. बलात्काराचे दृश्य चित्रीत करत असताना जया प्रदा यांनी दिलीप ताहील यांच्या कानाखाली आवाज काढल्याची चर्चा आजही ऐकू येते. अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्यावरही असाच एक आरोप लावण्यात आला होता. अभिनेत्री सुष्मिता सेनने त्यांच्यावर हा आरोप लावला होता.
2006 साली चिंगारी नावाच्या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन एकत्र काम करत होते. कल्पना लाजमी हा चित्रपट दिग्दर्शित करत होत्या. चित्रीकरण हे महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये सुरु होतं. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मिथुन यांच्यावर आरोप लागल्याने वाद निर्माण झाला होता. चित्रपटामध्ये मिथुन आणि सुष्मिता सेन यांच्यात एक इंटीमेट सीन (शारीरीक संबंध दाखवणारे दृश्य) होता. या दृश्यामुळे सुष्मिता घाबरली होती, ज्यामुळे एका मागोमाग एक असे बरेच रिटेक झाले. दृश्य पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच फायनल टेकनंतर सुष्मिता रागारागाने तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये निघून गेली होती.
सुष्मिताला काय झालं असं विचारण्यासाठी दिग्दर्शिका कल्पना लाजमी तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेल्या होत्या. त्यांनी कारण विचारल्यानंतर सुष्मिताने सांगितलं की मिथुन यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला आणि त्यांनी हे मुद्दाम केलं होतं. कल्पना लाजमी यांनी सुष्मिताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या दृश्यांमध्ये असा प्रकार बरेचदा होतो असं त्या सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, मात्र सुष्मिता ऐकायला तयार नव्हती. ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचली ज्यामुळे त्यावर बरीच चर्चा रंगली होती.
या आरोपांमुळे मिथुन चक्रवर्ती नाराज झाले होते. त्यांनी हा चित्रपट सोडून देण्याचं ठरवलं होत, मात्र कल्पना लाजमी यांनी त्यांना समजावल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला होता. सुष्मिताने नंतर बोलताना म्हटले की कदाचित त्यावेळी माझी काहीतरी गैरसमजूत झाली असावी मात्र मी मिथुन यांचा नेहेमी आदर करत आले आहे.