२००० रुपयांच्या नोटा बंदीमुळे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तर यूपीआयचे व्यवहार घटले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ जुन । रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करताच घराघरांतील या नोटा खर्च करण्यासाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. यामुळेच एरवी यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या नागरिकांनी बहुतांश व्यवहार या नोटांनी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी नोटाबंदीच्या पहिल्या आठवड्यात याच काळातील गेल्या ४ महिन्यांच्या तुलनेत यूपीआयच्या वापरात ७%, क्रेडिट कार्ड १२% तर डेबिट कार्डच्या व्यवहारात २०% घट झाली. बंदीच्या पहिल्या २ आठवड्यांत चलनातील एकूण नोटांपैकी तब्बल ५० टक्के नोटा बँकेत जमा झाल्या आहेत.आरबीआयच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

९ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. त्यानंतर ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या. आता २०००ची नोटही बाद करण्याचा निर्णय आरबीआयने ‘क्लीन नोट पॉलिसी’अंतर्गत जाहीर केला. या नोटा लगेच बंद होणार नाहीत किंवा चलनातून बाद होणार नाहीत. त्या बँकेत जमा करून २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत बदलून घेता येतील. अनेक घरांमध्येही २००० च्या नोटा होत्या. बँकेच्या रांगेत उभे राहून त्या बदलून घेण्याऐवजी खर्च करण्याकडे नागरिकांचा कल आहे. यामुळे यूपीआय व कार्डावरील व्यवहार घटल्याचे आरबीआयच्या अहवालातून दिसते. दरम्यान, या काळात नोटा बदलून घेण्यापेक्षा त्या खात्यात जमा करण्यावर नागरिकांचा भर आहे. तर याच कालावधीत बँकांतील ठेवींमध्ये मोठी वाढ झाली आहे.

अशी केली पाहणी
आरबीआयने १९ मे २०२३ रोजी २००० च्या नोटाबंदीची घोषणा केली. यामुळे १९ ते ३० मेदरम्यान करण्यात आलेल्या व्यवहारांबाबत आरबीआयच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला. तुलना करण्यासाठी या कालावधीत जानेवारी ते एप्रिल महिन्यातील व्यवहार पडताळले. यातून २००० च्या नोटांचा वापर वाढला असून त्याचा अन्य व्यवहारांवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले.

डेबिट कार्ड व्यवहारात २० टक्के घट
२०१६च्या नोटाबंदीनंतर डेबिट कार्डचा वापर घटल्यास यूपीआयचा वापर वाढतो असे समीकरण होते. मात्र, यंदा २०००च्या नोटाबंदीनंतर यूपीआय व डेबिट कार्डच्या व्यवहारात घट झाली. १९ ते ३० जानेवारी -९५६ ते १०६१ कोटी, फेब्रुवारी-९४५ ते १०२८ कोटी, मार्च-९३७ ते १००४ कोटी, एप्रिल -९४४ ते ११४९ कोटी तर मेमध्ये ९५६ कोटींचे व्यवहार झाले. एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये १९३ कोटींचे (२०.१८ %) डेबिट कार्डचे व्यवहार घटले.

क्रेडिट कार्डच्या व्यवहारातही मेमध्ये १२ टक्के घट
क्रेडिट कार्डावर १९ ते ३० जानेवारी- १०७१ ते १३१९ कोटी, फेब्रुवारी -११२१ ते १२१७ कोटी, मार्च -११८४ ते १३०८ कोटी, एप्रिल -१२४२ ते १३८४ कोटी, तर मे महिन्यात १२३८ कोटींचे व्यवहार झाले. एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये १४६ कोटींचे (११.८३ %) व्यवहार घटले.

यूपीआय व्यवहारांत ७ टक्के घट
२०१६ च्या नोटाबंदीनंतर यूपीआय व्यवहारांमध्ये मोठी वाढ झाली. मात्र, आता २००० च्या नोटाबंदीनंतर यात घट झाली आहे. १९ ते ३० तारखेदरम्यान जानेवारीत ३७ ते ३९ हजार कोटी रुपये, फेब्रुवारी-३९ ते ४१ हजार कोटी, मार्च -४१ ते ४३ हजार कोटी, एप्रिल -४३ ते ४६ हजार कोटी, तर मे महिन्यात ४३ हजार कोटी रुपयांचे सरासरी व्यवहार झाले. एप्रिलच्या तुलनेत मेमध्ये तब्बल ३ हजार कोटी रुपयांचे (७%) यूपीआय व्यवहार घटले.

– २०००च्या नोटांवर बंदी जाहीर होताच डेबिट कार्डचा वापर १२%, क्रेडिट कार्डचा वापर २०%, तर यूपीआयचे व्यवहार ७% घटले 80% लोकांचा नोटा थेट खात्यात जमा करण्यावर भर

– 1.80 लाख कोटींच्या नोटा जमा झाल्या केवळ ८ दिवसांत

– 23 मेपासून २०००च्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू

– 2019 पासून नोटांची छपाई पूर्णपणे बंद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *