Traffic Rules : बाइकची चावी काढण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही; न्यायालयाने आदेशात काय म्हटलंय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुन । बाइक चालवताना नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास वाहतूक पोलिसांना कारवाई करताना अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. तसेच पोलीस गाडीची चावी काढताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र बाइकची चावी अशा पद्धतीने काढण्याचे अधिकार पोलिसांना नाही, असं मुंबई सत्र न्यायालयाने एका प्रकरणात म्हटलं आहे.

वाहतूक पोलिसांना दणका देत मुंबई सत्र न्यायालयाने वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांच्या वाहनांच्या चाव्या काढण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही.

तसेच ड्रायव्हिंग लायसन्स दाखवल्यानंतर दंड वसूल करण्यासाठी बाइक चालकाला पोलीस ठाण्यात नेण्याची सक्ती देखील पोलिस करू शकत नाहीत. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका आरोपीची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने आपल्या आदेशात हे सांगितले आहे. (Latest Marathi News)

वाहतूक पोलिसांनी सागर पाठक या तरुणाला शासकीय अधिकाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण करून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली होती. 25 मार्च 2017 रोजी या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.

माहितीनुसार आरोपी कुलाबा परिसरात विनाहेल्मेट बाइक चालवत होता. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्याने आरोपीवर कारवाई करत दंड भरण्यास सांगितले. मात्र आरोपींने पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने न्यायालयात आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

अतिरिक्त न्यायाधीश एनपी मेहता यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला लायसन्स दिल्याचे न्यायाधीशांनी नमूद केले. त्यानंतर आरोपीला पोलीस ठाण्यात नेण्याची गरज नव्हती. वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यावर आरोपीने हल्ला केल्याचे कोणतेही ठोस पुरावे आमच्यासमोर नाहीत. त्यामुळे न्यायालयाने आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *