महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नांदेड – संजीवकुमार गायकवाड -, दि. 1२ :ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकार्यांचा भरणा मोठया प्रमाणात असून कंपनी नियमानुसार महावितरणची क्षमतावृध्दी अपेक्षित आहे. या विभागाशी संबंधीत असंख्य तक्रारी येत असतात. याचाच अर्थ महावितरणच्या प्रणालीमध्ये दरी असल्याचे आढळून येते. तसेच रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचार्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर आहे, त्यामुळे तरुणांच्या रोजगाराची संधी हिरावल्या जातेय असे मत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले.
महावितरण कंपनी मध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचार्यांच्याबाबत डॉ.नितीन राऊत यांनी (दि.10) संबंधीत अधिकार्यांसमवेत झालेल्या बैठकीत आढावा घेतला.महावितरण कंपनीमध्ये आकृतीबंधानुसार असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदार्यांचे पुर्नमुल्यांकन करुन ही पदे खरोखरच आवश्यक आहेत काय, या बाबत आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान शाखेत सुमारे 550 पदे असतांना सुध्दा या क्षेत्रात हवी ती उंची गाठता आलेली नाही. राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यामध्ये सुसुत्रता निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे या शाखेला सुधारणे, अद्ययावत करणे महत्वाचे आहे. महावितरणच्या वित्त विभागात देखील मोठया प्रमाणात पदे अस्तित्वात असून या क्षेत्रातही महावितरणचे काम समाधानकारक नाही. सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामांचे, त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदार्यांचे पुनर्मुल्यांकन करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संचालक (मानव संसाधन) महावितरण यांना देण्यात आले .