महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – माजलगाव : धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील कोरोनाग्रस्ताशी संपर्क आल्याने माजलागावातील देशपांडे हाॅस्पिटल सील करून डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर डाॅक्टरसह कर्मचाऱ्यांनी बँड लावून नाचगाणे करत जल्लोष साजरा केला. या ओंगळवाण्या जल्लोषाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून डाॅक्टर आणि इतरांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील एक रुग्ण कोरोनाबाधित आढळला होता. या रुग्णाने सुरूवातीला माजलगाव येथील डाॅ. श्रेयश देशपांडे यांच्या रूग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आले होते. यामुळे या हाॅस्पिटलचे डाॅक्टर व इतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. बुधवारी हे स्वॅब तपासणीसाठी पाठवले गेले होते. या अहवालांकडे माजलगावकरांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, बुधवारी मध्यरात्री याचे अहवाल आले. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने माजलगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, आनंदाच्या भरात गुरूवारी सकाळी डाॅ. देशपांडे यांनी आपल्या रुग्णालयासमोर ढोल ताशा वाजवून जल्लोष केला.रुग्णालय कर्मचारी, स्नेही यांनी फटाके वाजवून, ढोल ताशाच्या गजरात नाचही केला. यात सोशल डिस्टन्स, जमावबंदी याचे उल्लंघन झाले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणी दखल घेत डाॅ देशपांडे विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.