महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । यंदा महाराष्ट्रात मान्सून उशिरा दाखल झाला आहे. मात्र, मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांनीही आता पेरणीची तयारी सुरू केली आहे.
पुण्यामध्येही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. आज बुधवारीही आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. घाट भागात तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा मान्सूनने राजधानी मुंबईत जोरदार एन्ट्री केली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचल्याने मुंबईकारांना त्रासाला सामोरे जावे लागले. तर पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात मुंबईकरांची सुटका झाली आहे. मंगळवारी तर मुंबईत आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उपराजधानी नागपुरात मान्सूनने हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारी शहरात दिवसभर पावसाने हजेरी लावली. आजही विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील पाच दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापमानात बदल जाणवत आहे. मंगळवार प्रमाणे आजही आकाश ढगाळ राहणार असून पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करून नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कोल्हापुरात मान्सूनने धडक दिली असून वातावरणात मोठे बदल जाणवत आहेत. पावसाने कोल्हापुरातील नाले तुडूंब झाले असून रस्त्यावर पाणी साचून राहिले. आजही मध्यम पावसासह आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.