“आता तुम्हाला कळेल बात कहाँ तक जाती है”, खासदार श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । वांद्र्यातील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेचं बांधकाम पाडण्याची कारवाई दोन दिवसांपूर्वी स्थानिक पालिका कार्यालयाकडून करण्यात आली. मात्र, या कारवाईवर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. कारवाईदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा टाकल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. तर कारवाईच्या आधी फोटो काढून घेण्याची परवानगी दिल्याचं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. संजय राऊत यांनी या कारवाईचे आदेश थेट वर्षावरून आल्याचा आरोप केला आहे. या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे.

संजय राऊतांनी केला होता आरोप
ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केला होता. “मुख्यमंत्र्यांचे दिवटे चिरंजीव यांच्याकडे कोणीतरी गेलं आणि त्यांनी आदेश दिले. पण त्यांना हे कळलं नाही की ज्या बाळासाहेबांच्या नावाने रोजीरोटी खात आहोत, कोट्यवधी कमवत आहोत, त्या बाळासाहेबांच्या फोटोवर हातोडे मारले जातात. हे कसले शिवसैनिक? वर्षा बंगल्यावरून आदेश आले. निर्लज्जपणाचा कळस आहे. हा नीचपणा आहे”, असं संजय राऊत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी सहपरिवार तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आले असता श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांच्या या आरोपांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. “त्यांना बोलायला काही राहिलेलं नाही. एसआयटी लागली, इडी लागली. यातून खूप काही बाहेर येणार आहे. आम्ही आमचं काम करतोय, सरकारी यंत्रणा त्यांचं काम करतेय. जे खरं आहे ते जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरण्यासारखं आणि विचलित होण्यासारखं काही नाही. आता तुम्हाला कळेल, बात कहाँतक जाती है”, असं सूचक विधान श्रीकांत शिंदे यांनी टीव्ही ९ शी बोलताना केलं.

केसीआर यांच्या टीकेवर प्रतिक्रिया
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बुधवारी पंढरपूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसेच, महाराष्ट्र सरकार व राज्यातील सर्वपक्षीयांवर जोरदार टीकाही केली. यावर त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर है, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. “आम्ही इथे कुठल्या अपेक्षा घेऊन येत नसतो. आज तेलंगणाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आहेत. आम्ही त्यांचं स्वागत केलं आहे. त्यांना त्यांचा पक्ष महाराष्ट्रात वाढवायचा आहे. टीका केल्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाहीत. आत्ता कुठे त्यांची सुरुवात झाली आहे. त्यांच्यासाठी दिल्ली अभी दूर है”, असं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *