पुण्यातील कोयता हल्ल्यावरून राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांना…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । पुण्यातील सदाशिव पेठेत काल (२७ जून) भयानक प्रकार घडला. भर दिवसा, भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यावेळी तेथील जमावाने बघ्याची भूमिका घेतल्याचं सीसीटीव्हीतील दृष्यातून स्पष्ट दिसत आहे. परंतु, लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून पीडितेला वाचवलं. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.”

“दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा,” असंही राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *