महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुन । मजल दर मजल करत लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरात (Pandharpur) दाखल झाले आहेत. शेकडो वर्षांची वारकरी संप्रदायाची वारीची परंपरा आजही उत्साहाने जोपासली जात आहे. आषाढी एकादशीसाठी (Aashadhi Ekadashi 2023) विठ्ठल नामाचा जयजयकार करीत वारकरी आळंदी ते पंढरपूर असा तब्बल 225 किलोमीटरचा पायी प्रवास करीत काल मंगळवारी पंढरपूरात दाखल झाले. अनेक भाविक एसटी, रेल्वे आणि खाजगी वाहानांनी पंढरपूरात आलेले आहेत. पालख्या समवेत असलेल्या दिंडीतील बहुतांश वारकरी आपापल्या मठामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्रा शेडच्या पुढे गेली आहे.
उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार महापूजा
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठूरायाची महापूजा करण्याची परंपरा आहे. या निमीत्याने उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा करतील. यासाठी ते आज विशेष विमाने संध्याकाळी चार वाजता सोलापूर येथे दाखल होणार आहेत आणि पुढे हेलिकॉप्टरने पंढरपूरात दाखल होतील. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पोहोचल्यावर येथे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर सोलापूर वनविभागाने तयार केलेल्या कॉफी टेबल बुक्या पुस्तकाचे प्रकाशन होईल. सायंकाळी पाच वाजता पंचायत समिती येथे आषाढी यात्रा स्वच्छता दिंडीचा समारोप होणार आहे.
उद्या पहाटे म्हणजे 29 जूनच्या पहाटे मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत. 29 जून रोजी सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे . सकाळी अकरा वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत. दुपारी आडे अकरा वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबीराची पाहणी करणार आहेत.
विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू राहणार
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढपूरात दाखल होतात. या भाविकांना विठुरायाचं दर्शन घडावं म्हणून 24 तास दर्शन सुरू करण्यात येतं. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी कालपासून 24 तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 जून ते 7 जुलै दरम्यान भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे या काळात व्हीआयपी व ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे. आषाढी एकादशी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत, अशी प्रथा आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. त्यानुसार विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो.