पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत होणार समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ जुलै । राज्यभरात आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पायी प्रवास करून पंढरपूरला येतात. यालाच आषाढी वारी किंवा पंढरपूर वारी म्हटले जाते. या वारीला 1000 हून अधिक वर्षांची परंपरा आहे. आता माहितीनुसार, लवकरच पंढरपूर वारीचा जागतिक वारसा यादीत समावेश होऊ शकतो. यासाठी केंद्र सरकार युनेस्कोला येत्या दोन ते तीन महिन्यांत प्रस्ताव सादर करेल. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचा वतीने हा प्रस्ताव सादर केला जाईल.

पंढरीच्या वारीची परंपरा फार जुनी आहे. साधारण तेराव्या शतकात वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. पुढे ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले.

वारीचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्टस्चे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी यांनी सांगितले की, वारीशी संबंधित सर्व साहित्यही संकलित करण्यात येत आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत पंढरपूर वारीला जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी युनेस्कोकडे पाठवला जाईल. अशा स्थितीत पंढरपूरच्या वारीला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बाब ठरणार आहे.

दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या गडकिल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील डोंगरी किल्ले, सागरी किल्ले आणि प्राचीन कातळशिल्पे या तीन प्रकारातील संवर्धन प्रस्ताव युनेस्कोला देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *