महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी -ओमप्रकाश भांगे – पुणे : कोरोनाच्या संसर्गाचा सामना करीतच राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षणाचा श्रीगणेशा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक आज जारी करण्यात आले. मुख्यमंत्री, शालेय शिक्षणमंत्र्यांनी विविध पातळ्यांवर चर्चा करून शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दर्शविला आहे.
आता शाळांतील स्वच्छतेची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागणार असून विलगीकरण केंद्र म्हणून वापरलेल्या शाळांतील खोल्यांचा वापर करण्यापूर्वी परवानगी पत्र घेणे अनिवार्य असेल. कंटेन्मेंट झोनमधील शाळांबाबतचा निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना घ्यावा लागेल. घरात राहून ऑनलाईन पद्धतीनेच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार असून नेहमीची पारंपरिक लेक्चर टाळून स्वयंअध्ययनावर त्यांना भर द्यावा लागेल. बाधित क्षेत्रांमध्ये शाळा सुरू करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागेल.