संसर्ग ; पक्षी, प्राण्यांपासून बर्ड फ्लू संसर्गाचा मानवाला धोका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । जगभरात अनेक देशांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे. पाळीव पक्षी, जंगलातील पक्ष्यांसोबत काही सस्तन प्राण्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. मानवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याच्या काही घटना या आधी घडल्या होत्या. आता बर्ड फ्लूचा प्रसार वाढल्याने मानवाला संसर्गाचा धोका वाढला आहे, अशा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रांचा अन्न व कृषी विभाग (एफएओ) आणि जागतिक पशुआरोग्य संघटना (डब्ल्यूओएएच) यांनी सर्व देशांना याबाबत आवाहन केले आहे. प्राणी आणि मनुष्यांचे संरक्षण करावे, असे त्यांनी म्हटले आहे. बर्ड फ्लू हा सर्वसाधारणपणे पक्ष्यांमध्ये पसरतो. परंतु, आता सस्तन प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढले आहे. पाळीव पक्षी आणि सस्तन प्राण्यांमधून हा विषाणू मानवामध्ये शिरकाव करू शकतो.

बर्ड फ्लू विषाणूच्या अनेक उपप्रकारांमुळे २०२० पासून मोठ्या प्रमाणात पाळीव पक्षी आणि जंगलातील पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. आफ्रिका, आशिया आणि युरोपमध्ये हे प्रमाण सर्वाधिक होते. नंतर उत्तर अमेरिका, मध्य व दक्षिण अमेरिकेत त्याचा प्रादुर्भाव वाढला. मागील वर्षी पाच खंडांमधील ६७ देशांमध्ये बर्ड फ्लूचा अतिसंसर्गजन्य उपप्रकार आढळून आला. त्यामुळे १३.१ कोटींहून अधिक पाळीव पक्ष्यांचा मृत्यू झाला अथवा त्यांना मारावे लागले. चालू वर्षात १४ देशांमध्ये बर्ड फ्लूचा उद्रेक सुरू आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

पाळीव प्राणी आणि पक्षी हे मानवाच्या जास्त संपर्कात असतात. त्यामुळे डिसेंबर २०२१ पर्यंत मानवाला बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याच्या आठ घटना घडल्या होत्या. मानवात याचा संसर्ग झाल्यास मृत्युदर अधिक आहे. पक्षी आणि प्राण्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाचे प्रमाण वाढल्याने मानवामध्ये संसर्ग वाढू शकतो. या रोगाचा मानवापासून मानवाला संसर्ग झाल्याचा प्रकार अद्याप समोर आलेला नाही; परंतु विषाणूच्या रचनेत होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे. या विषाणूमध्ये भविष्यात होणारे बदल मानवासाठी घातक ठरू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

सध्या युरोपमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग वाढला आहे. याआधी मानवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची उदाहरणे आढळली होती. युरोप आणि इतर देशांमध्ये असे रुग्ण आढळले होते. भारतात असा प्रकार घडलेला नाही. बर्ड फ्लूच्या संसर्गाचा मानवाला धोका आधीपासून आहे. त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. – डॉ. वर्षा पोतदार, शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था

बर्ड फ्लूचा देशभरात सध्या कोठेही उद्रेक झालेला नाही. पशुसंवर्धन विभागाकडून नियमितपणे प्रत्येक जिल्ह्यातून आजारी पक्षी आणि प्राण्यांचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी केली जात आहे. बर्ड फ्लूच्या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. विषाणूमध्ये होणारे बदलही तपासले जात आहेत. – डॉ. देवेंद्र जाधव, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *