मराठीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे काळाच्या पडद्याआड ; वयाच्या ८८ व्या वर्षी ठाण्यात निधन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । ज्येष्ठ मराठी अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाल्याची बातमी २४ जुलै रोजी येऊन धडकली. मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या जयंत सावरकर यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सावकरकर यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. जयंत (अण्णा) सावरकर यांचे ठाणे याठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ त्यांनी सिनेसृष्टीत आपला दबदबा निर्माण केला आहे. लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना आपलीशी करतील अशी विविध पात्र त्यांनी साकारली. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.

०३ मे १९३६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये जन्मलेल्या सावरकरांनी वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांनी अनेक वर्ष बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणूनही काम पाहिले होते. सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. याकरता त्यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यांच्या अलीकडच्या काही दिवसांमधील कामाविषयी बोलायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी कांचन आजींच्या भावाची भूमिका साकारली. शिवाय ‘समांतर’ या स्वप्निल जोशीच्या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विषेश गाजली.

‘एकच प्याला’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’, ‘कथा नव्या संसाराची’ या नाटकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील त्यांनी साकारलेला अंतू बर्वा आजही आठवतो. दरम्यान ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकांमध्ये ते दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *